आयटीआयनंतर थेट कॉलेजमध्ये!
By Admin | Updated: May 10, 2015 00:59 IST2015-05-10T00:57:46+5:302015-05-10T00:59:54+5:30
पणजी : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधून आता विविध कौशल्य विकसित करणारे नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आठवीत

आयटीआयनंतर थेट कॉलेजमध्ये!
पणजी : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधून आता विविध कौशल्य विकसित करणारे नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आठवीत उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना दोन वर्षे आयटीआयमध्ये शिक्षण घेऊन थेट अकरावीत प्रवेश घेण्याची किंवा दहावीत उत्तीर्ण झालेल्या मुलांना थेट कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी त्यामुळे मिळणार आहे. क्राफ्टमन ट्रेनिंग खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी शनिवारी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.
कारखाने व बाष्पक निरीक्षकालय हे खातेही मंत्री ढवळीकर यांच्याकडे आहे. ते सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांची तिथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. एका परिषदेतही भाग घेतला. मंत्री ढवळीकर यांनी सांगितले की, गोव्यातील आयटीआय क्षेत्राचा पूर्ण नकाशाच आता बदलणार आहे. सगळा अभ्यासक्रम तयार झाला असून त्याची अंमलबजावणी आता सुरू होईल. प्रत्येक मुला-मुलींच्या कौशल्यानुसार त्यांना शिक्षण मिळावे, अशी सोय केली जाणार आहे. यासाठी सर्व ते साहाय्य करण्याचे आश्वासन आपल्याला केंद्रीय मंत्री रुडी यांनी दिले आहे.
मंत्री ढवळीकर म्हणाले की, आता राज्यातील आयटीआयमध्ये आठवी उत्तीर्ण मुलांनी प्रवेश घेतला, तर दोन वर्षांनी त्यांना दहावी (एसएससी) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राच्या आधारे मुले मग हायर सेकंडरीत अकरावीत प्रवेश घेऊ शकतील. त्याचप्रमाणे दहावी शिकून मग कॉलेजला न पोहोचणारी मुलेदेखील दहावीनंतर दोन वर्षे आयटीआयमध्ये शिकली, तर त्यांना बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल.
या प्रमाणपत्राच्या आधारे मुले मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतील. (खास प्रतिनिधी)