दसऱ्यानंतर अनेक नेतेमंडळी गोवा फोरवर्डमध्ये प्रवेश करणार, विजय सरदेसाई यांचे सूतोवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 17:43 IST2020-10-21T17:43:35+5:302020-10-21T17:43:59+5:30
Goa : सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी बुधवारी सावंत सरकारचा पाठिंबा मागे घेतला.

दसऱ्यानंतर अनेक नेतेमंडळी गोवा फोरवर्डमध्ये प्रवेश करणार, विजय सरदेसाई यांचे सूतोवाच
मडगाव : सध्या गोव्यात राजकीय परिस्थिती काहीशी बदलत असताना दसऱ्यानंतर अनेक स्वाभिमानी राजकीय पुढारी गोवा फॉरवर्डमध्ये सीमोल्लंघन करतील, असे सूचक सूतोवाच या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी बुधवारी केले.
सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी बुधवारी सावंत सरकारचा पाठिंबा मागे घेतला. त्याचबरोबर उत्तर गोव्यातील एक निष्ठावंत भाजपा कार्यकर्ता भाजपाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा सुरु झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी मडगावात बोलताना हे सूचक उद्गार काढले.
ते म्हणाले, असत्याचा सत्यावर विजय मिळविणे दसऱ्याच्या मुहूर्तावर होत असते. गोव्यात अनेक स्वाभिमानी कार्यकर्ते या असत्याचा सरकारला विटले आहेत. ते स्वाभिमान्यांचा पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षात सामील होणार आहेत. 25 ऑक्टोबरला असे सीमोल्लंघन होणार, 26 ऑक्टोबरलाही काहीजण पक्षात प्रवेश करू शकतात. हे यापुढे चालूच राहणार आहे, असे सरदेसाई म्हणाले.
यापूर्वी थिवीचे माजी भाजपा आमदार किरण कांदोळकर यांनी भाजपा सोडण्याचे संकेत दिले होते. ते गोवा फॉरवर्ड पक्षात सामील होणार असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी सरदेसाई आणि कांदोळकर हे एकमेकांना भेटून त्यांनी चर्चाही केली होती. मांद्रे येथील असंतुष्ट स्थानिक भाजपा नेते दीपक कलांगूटकर हेही गोवा फॉरवर्ड पक्षात सामील होतील अशी हवा तयार झाली आहे.