अपहरणकर्त्याला रेल्वे स्थानकावर पकडून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची केली सुखरुप सुटका
By पंकज शेट्ये | Updated: December 19, 2023 18:45 IST2023-12-19T18:45:24+5:302023-12-19T18:45:37+5:30
एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची माहीती वास्को पोलीसांना मिळाल्याच्या दोन तासातच पोलीसांनी मुलीचा शोध लावून तिला सुखरुपरित्या आणले.

अपहरणकर्त्याला रेल्वे स्थानकावर पकडून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची केली सुखरुप सुटका
वास्को : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची माहीती वास्को पोलीसांना मिळाल्याच्या दोन तासातच पोलीसांनी मुलीचा शोध लावून तिला सुखरुपरित्या आणले. नवेवाडे येथे राहणारा २० वर्षीय महम्मद झुन्नू (मूळ: बिहार) नामक तरुण त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला घेऊन मडगाव रेल्वे स्थानकावर पोचल्याची माहीती पोलीसांना मिळताच त्यांनी महम्मदच्या मुसक्या रेल्वे स्थानकावर आवळून अल्पवयीन मुलीची त्याच्याकडून सुखरुप सुटका केली.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी (दि.१८) त्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रकार घडला. वास्को पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीच्या कुटूंबातील सदस्यांनी सोमवारी रात्री २०.४५ वाजता पोलीस स्थानकावर येऊन त्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली.
त्यांची मुलगी सकाळी १० वाजता घरातून निघून गेल्यानंतर अजून परतली नसल्याची तक्रार मुलीच्या कुटूंबातील सदस्याने दिल्यानंतर पोलीसांनी लगेच मुलीचा शोध घेण्याच्या कामाला सुरवात केली. पोलीसांनी चौकशीला सुरवात केली असता महम्मद झुन्नू नावाच्या तरुणाने त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचे उघड झाले. नवेवाडे येथे राहणारा महम्मद हा मूळ बिहार येथील असून तो कामाच्या निमित्ताने गोव्यात राहत होता असे पोलीसांना चौकशीत कळाले. महम्मद ने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तो तिला घेऊन मडगाव रेल्वे स्थानकावर पोचल्याचे समजताच पोलीसांनी त्वरित मडगाव रेल्वे स्थानकावर धाव घेतली. पोलीसांनी मडगाव रेल्वे स्थानकावर पोचून महम्मदचा शोध लावून त्या अल्पवयीन मुलीची त्याच्याकडून सुखरुप रित्या सुटका केली. वास्को पोलीसांनी महम्मद विरुद्ध भादस ३६३ आणि गोवा बाल कायद्याच्या ८ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. महम्मद यांने त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तो तिला गोव्याबाहेर घेऊन जाण्यासाठी मडगाव रेल्वे स्थानकावर पोचला होता असे पोलीसांना चौकशीत कळाले आहे. वास्को पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयुर सावंत अधिक तपास करित आहेत.