लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. २०१४ मध्ये केवळ २.८ गिगावॅट सौरऊर्जा क्षमता असलेल्या भारताने गेल्या महिन्यात १०० गीगावॅट सौरऊर्जा क्षमता पार केली आहे. म्हणजेच ३५ पट इतकी लक्षणीय वाढ झालेली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज केले.
आयआयटी दिल्ली येथे राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात मंत्री श्रीपाद नाईक संबोधित करत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. श्रीकृष्णन (उपसंचालक, आयआयटी दिल्ली), डॉ. संगीता कस्तुरे (सल्लागार व शास्त्रज्ञ 'जी'), एमएनआरई प्रा. विवेक कुमार (प्रमुख, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्र आयआयटी दिल्ली), प्रा. विजय (समन्वयक बीडीटीसी, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली) उपस्थित होते. आयआयटी दिल्ली आणि बायोगॅस विकास व प्रशिक्षण केंद्र यांनी हा महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित केला.
सौर आणि पवनऊर्जेच्या वाढीसोबतच बायोएनर्जी क्षेत्रालाही वेग द्यायची गरज आहे, असे सांगून नाईक म्हणाले की, बायोएनर्जी ही आपल्या नवीकरणीय ऊर्जा धोरणाचा एक प्रमुख स्तंभ आहे. ही स्वच्छ ऊर्जा तर आहेच, पण त्यासोबतच कचरा व्यवस्थापन, ग्रामीण सशक्तीकरण आणि ऊर्जा आयात कमी करण्यास मदत करते.
कृषी अवशेष, नगरपालिका घनकचरा आणि पशुधन मलमूत्र यांचा उपयोग करून पर्यावरणपूरक वर्तुळाकार अर्थव्यवस्था निर्माण करता येईल सोबत स्वच्छ आणि हरित भारत घडवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मंत्री नाईक यांनी केले. यावेळी मंत्री नाईक यांनी देशातील उत्पादित ऊर्जेविषयी सविस्तर माहिती देत, मागील प्रगतीचा आढावाही घेतला.
उत्पादनक्षमता ३०० टक्के वाढली
२०१४ मध्ये ७५.५२ गिगावॅट असलेली नवीकरणीय ऊर्जा क्षमता आता २२० गिगावॅट झाली आहे. म्हणजे सुमारे ३०० टक्के वाढ झालेली आहे. बायोगॅस उत्पादन, वीजनिर्मिती आणि संकुचित बायोगॅस तंत्रज्ञानासंबंधी हा कार्यक्रम आपल्या नवीकरणीय ऊर्जा संक्रमणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे केंद्रीय मंत्री नाईक यांनी पुढे नमूद केले.