बाबूश, माविनवर कारवाई अटळ

By Admin | Updated: February 8, 2015 01:31 IST2015-02-08T01:30:41+5:302015-02-08T01:31:50+5:30

पणजी : काँग्रेसचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि माविन गुदिन्हो यांनी पक्षाशी पूर्ण असहकार पुकारल्याची गंभीर दखल

Action on Babush, Mavin is inevitable | बाबूश, माविनवर कारवाई अटळ

बाबूश, माविनवर कारवाई अटळ

पणजी : काँग्रेसचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि माविन गुदिन्हो यांनी पक्षाशी पूर्ण असहकार पुकारल्याची गंभीर दखल काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रथमच घेतली आहे. मोन्सेरात व माविन यांच्यावर काँग्रेसने कारवाई करण्याचे तत्त्वत: ठरविले आहे. पणजी पोटनिवडणुकीनंतर कारवाईचा आदेश लगेचच जारी होणार असल्याची माहिती मिळाली.
मार्च २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गुदिन्हो दाबोळी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले. त्यावेळपासून गुदिन्हो यांनी नेहमीच काँग्रेसशी असहकार पुकारला. आपल्याला विरोधी पक्षनेतेपद दिले गेले नाही म्हणून गुदिन्हो यांनी भाजपशी सख्य जुळविले. पुढील विधानसभा निवडणूकही ते भाजपच्याच उमेदवारीवर लढवतील, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित करण्याचे जवळजवळ निश्चित केल्याची माहिती राजकीय गोटात पसरली आहे.
२०१२ साली काँग्रेसच्या उमेदवारीवर सांताक्रुझ मतदारसंघातून निवडून आलेले बाबूश मोन्सेरात यांनी तर काँग्रेसचे निरीक्षक चेल्लाकुमार यांना आव्हानच दिले. पणजी पोटनिवडणुकीत काँग्रेससाठी काम करावे, अशी सूचना चेल्लाकुमार यांनी मोन्सेरात यांना केली होती. तथापि, आपण काँग्रेससाठी काम करणार नाही, उलट काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांचा पराभव व्हावा म्हणूनच प्रयत्न करीन, असे मोन्सेरात यांनी चेल्लाकुमार यांना सांगितले. त्यांनी या निवडणुकीत भाजपला अप्रत्यक्ष मदत करण्याचेही काम सुरू केले आहे. याविरुद्ध काँग्रेसने श्रेष्ठींकडे अहवाल पोहचविला.
मोन्सेरात यांच्या विरोधातही पक्षाने कारवाई करण्याचे ठरविले आहे. निवडणूक निकालानंतर मोठ्या घडामोडी काँग्रेसमध्ये अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसच्या
एका जबाबदार पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’जवळ या वृत्ताला दुजोरा दिला. पक्षाने दोन्ही आमदारांची दखल घेतल्याचे या पदाधिकाऱ्याने
सांगितले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Action on Babush, Mavin is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.