खातेवाटप आज
By Admin | Updated: November 15, 2014 02:05 IST2014-11-15T01:53:45+5:302014-11-15T02:05:38+5:30
मिकी, आवेर्तानचा शपथविधी : गृह खाते उपमुख्यमंत्र्यांकडे?

खातेवाटप आज
पणजी : आमदार मिकी पाशेको व आवेर्तान फुर्तादो या दोघांचाही मंत्री म्हणून शपथविधी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता काबो राजनिवासावर पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून सर्व मंत्र्यांना खात्यांचे वाटप केले जाणार आहे.
पाशेको हे चार-पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा मंत्री बनणार आहेत. त्यांच्या नावावर अनेक गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी त्यांना एका प्रकरणात अटकही झाली होती व त्यांचे मंत्रिपद गेले होते. त्या वेळी दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार अधिकारावर होते. आता पुन्हा एकदा पाशेको यांचा मंत्री म्हणून शपथविधी होत आहे. नावेलीचे आमदार आवेर्तान फुर्तादो यांची प्रतिमा मात्र चांगली असून ते गेली अडीच वर्षे मंत्री होते. त्यांचाही शनिवारी शपथविधी होणार आहे. फुर्तादो यांच्याकडे मच्छीमार व मजूर ही खाती होती. त्यांना आता कोणती खाती दिली जातील, ते स्पष्ट झालेले नाही.
आपल्याला कोणते खाते मिळेल, याकडे सर्व मंत्र्यांचे लक्ष आहे. वजनदार खाते मिळविण्यासाठी काही मंत्री प्रयत्नशील आहेत. गृह खाते उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना दिले जाईल, अशीही चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना गृह खाते दिले जाण्याची शक्यता असली, तरी त्यांना अर्थ खाते हवे आहे, असे सूत्रांनी सांगितले. महसूल व नगरविकास ही खाती यापूर्वी डिसोझा यांनी सांभाळली आहेत. मंत्री सुदिन ढवळीकर यांना सार्वजनिक बांधकाम खाते पुन्हा दिले जाईल; पण वाहतूक किंवा नदी परिवहन या दोनपैकी एक खाते भाजपच्या मंत्र्यास दिले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्याकडे आता पुन्हा नागरी पुरवठा खाते दिले जाणार नाही. खाण, नगरनियोजन, अबकारी, अर्थ ही खाती मुख्यमंत्री स्वत:कडे ठेवतील.
भाजपचे काही आमदार आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराजी व्यक्त करत आहेत. सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्यावर पक्षाने अन्याय केला, अशा प्रकारची तीव्र भावना काही आमदारांमध्ये आहे. आर्लेकर, मायकल लोबो, विष्णू वाघ, किरण कांदोळकर, प्रमोद सावंत यांनाही आपल्याला मंत्रिपद मिळावे, असे वाटत होते; पण भाजपने उत्तर गोव्यातील आणखी आमदारांना मंत्रिपद न देता सासष्टीतील ख्रिस्तीधर्मीय बिगर भाजप आमदारांनाच मंत्रिपद देणे पसंत केले आहे. आमदार सावंत यांना साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे त्यांची तक्रार नाही. तथापि, वाघ, लोबो आदी आमदार अस्वस्थ आहेत. यापुढे होणाऱ्या विधानसभा अधिवेशनावेळी भाजप आमदारांमधील अस्वस्थता बाहेर येईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
(खास प्रतिनिधी)