पंकज शेट्ये,वास्को: गोव्याच्या खोल समुद्रातून कुजलेल्या अवस्थेत पद्मलोचन सलीमा (वय २०, मूळ: ओडीशा) याचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्यावर शवचिकित्सा केली असता त्याचा खून केल्याचे निश्पन्न झाले. पद्मलोचनच्या बरगड्यावर हत्याराने हल्ला करून त्याचा खून करून मृतहेत समुद्रात टाकल्याचे शवचिकित्सा आणि चौकशीत उघड झाल्यानंतर हार्बर कोस्टल सेक्युरीटी पोलीसांनी पद्मलोचनच्या खून प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध भादस ३०२ आणि २०१ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
हार्बर कोस्टल सेक्युरीटी पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी दिलेल्या माहीतीनुसार ८ जानेवारीच्या रात्री ११.३० ते ९ जानेवारी सकाळी १० वाजेपर्यंत ‘इस्तेला - २’ नामक मासेमारी ट्रोलर मालिम जेटीवरून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. मासेमारीसाठी गेलेल्या त्या ट्रोलरवर एकूण ३२ कामगार मासेमारी करता गेले होते. ती ट्रोलर मासेमारी करून मालेम जेरीवर परतली असता त्याच्यावर काम करणारा कामगार पद्मलोचन सलीमा बेपत्ता असल्याचे आढळून आले. पद्मलोचन सापडला नसल्याने नंतर ट्रोलरचा मालक इशान डीसोझा यांनी त्याच्या बेपत्ता असण्याची तक्रार पर्वरी पोलीस स्थानकावर नोंदवली होती. १२ जानेवारीला समुद्रात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह तरंगत असल्याचे नौदलाच्या जहाजावरील नौदल कर्मचाऱ्यांना दिसताच त्यांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन हार्बर कोस्टल सेक्युरीटी पोलीसांच्या ताब्यात दिला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटणे कठीण झाल्याने त्याची ओळख पटवण्यासाठी पोलीसांनी चौकशीला सुरवात चौकशी वेळी एका मासेमारी ट्रोलरवरील कामगार पद्मलोचन बेपत्ता असल्याची तक्रार पर्वरी पोलीस स्थानकावर नोंद असल्याचे हार्बर कोस्टल सेक्युरीटी पोलीसांसमोर उघड झाले.
पोलीसांनी त्वरित ओडीशा येथून पद्मलोचनच्या वडीलांना बोलवून वैद्यकीय रित्या मृतदेहाची तपासणी केली असता तो मृतदेह पद्मलोचनचा असल्याचे उघड झाल्याची माहीती पोलीस निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी दिली. समुद्रातून कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह पद्मलोचनचा असल्याचे उघड झाल्यानंतर पोलीसांनी अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण नोंद केले. पोलीसांनी पद्मलोचनचा मृतदेह शवचिकीत्सेसाठी पाठवला असता त्याचा मृत्यू त्याच्या बरगड्यांवर हल्ला झाल्याने झाल्याचे आढळून आल्याची माहीती पोलीस निरीक्षक वेळीप यांनी दिली. पद्मलोचनचा खून करून अज्ञात आरोपीने मृतदेह समुद्रात फेकल्याचे पोलीसांना चौकशीत समजताच शुक्रवारी (दि.२६) पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादस ३०२ आणि २०१ कलमाखाली गुन्हा नोंद केला.
पद्मलोचनचा खून कोणी केला ते अजून उघड झालेले नसून त्याच्याबरोबर त्या दिवशी मासेमारी ट्रोलरवर गेलेल्या ३१ जणांपैकी कोणीतरी त्याचा खून केला असावा असा दाट संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. हार्बर कोस्टल सेक्युरीटी पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रदीप वेळीप यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.