फोंड्यात गायीने दिला चक्क जुळ्या वासरांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2023 15:54 IST2023-10-20T15:54:06+5:302023-10-20T15:54:18+5:30
सुहास कोरडे यांचा आई, पत्नी, मुलगा व दोन विवाहित कन्या असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या घराशेजारीच गुरांसाठी तीन गोठे बांधले आहेत

फोंड्यात गायीने दिला चक्क जुळ्या वासरांना जन्म
गीतेश वेरेकर
गोवा - निसर्गात घडणाऱ्या नेहमीच्या गोष्टी व्यतिरिक्त नवीन काही घडले की ती बाब चर्चेचा व कुतूहलाचा विषय बनते. अशा प्रकारचा कुतूहलाचा व दुर्मिळ प्रकार फोंडा तालुक्यातील ढवळी येथे घडला आहे. मधलावाडा - ढवळी येथील बागायतदार व पशूपालक सुहास गोविंद कोरडे यांच्या मालकीच्या एका गायीने एकाच वेळी चक्क दोन जुळ्या शुभ्र वासरांना जन्म दिला आहे. त्यातील एक वासरू नर तर दुसरे मादी आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात देवीचा प्रसाद म्हणून ही लक्ष्मी नारायणाची जोडी अवतरली अशीच भावना व्यक्त होत आहे. ही घटना दुर्मिळ असल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात असून गायीला जुळे झाल्यामुळे कोरडे कुटुंबियांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
ढवळी येथील ६० वर्षीय सुहास कोरडे हे गेली चाळीस वर्षे पशूपालक म्हणून वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय सांभाळतात. त्यांची स्वतःची बागायत असून जोड व्यवसाय म्हणून गोपालन करीत वडिलोपार्जित दुधाचा व्यवसाय सांभाळतात. बागायती व दुग्ध व्यवसायावरच ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात.
सुहास कोरडे यांचा आई, पत्नी, मुलगा व दोन विवाहित कन्या असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या घराशेजारीच गुरांसाठी तीन गोठे बांधले आहेत. सुरुवातीला ते ३५ ते ४० गुरांचे संगोपन करायचे. परंतु कामगार मिळत नसल्यामुळे सध्या गोठ्यात दहा गुरे आहेत. या कामात त्यांना त्यांचा २५ वर्षीय मुलगा दत्तात्रय मदत करतो. या गाईचे वय ४ वर्षे असून ही दुसरी वेत असल्याचे कोरडे यांनी सांगितले. गायीने जुळ्या वासरांना जन्म दिल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. कुटुंबीयांनी गोमातेची आयुष्यभर मनोभावे सेवा केली. त्यामुळेच नवरात्रोत्सवाच्या काळात हा देवीचा कौल त्यांना मिळाला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, गाळाशिरे केंद्राचे पशू वैद्यकीय सहाय्यक मदनंत प्रभू यांनी घटनास्थळी जाऊन वासरांची तपासणी केली. वारसांची प्रकृती सुदृढ व ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. गायीने जुळ्या वासरांना जन्म दिल्याच्या घटना क्वचितच घडतात. तसे झाल्यास वासरांना धोका असतो. पण दोन्ही वासरे सुखरूप आहेत. त्यांची व्यवस्थित काळजी घेण्याची आवश्यकता आहे. काही वर्षांपूर्वी तळावली येथे असाच प्रकार घडलेला असल्याचे श्री. प्रभू यांनी सांगितले. सर्वत्र नवरात्र उत्सव सुरु असताना श्वेत गाईच्या रुपात दुर्गा देवीने गायीच्या पोटी जुळी वासरे जन्माला घातल्याचे सांगत सुहास यांनी आनंद व्यक्त केला. अनेक ग्रामस्थांनी गाईचे व त्या ब्रह्मा आणि दुर्गारुपी जुळ्या वासरांचे दर्शन घेतल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कवळे जैववैविधता मंडळाचे अध्यक्ष निलेश नाईक यांनी तेथे भेट दिली.