९९ टक्के मसाज पार्लर बेकायदा
By Admin | Updated: July 7, 2014 02:35 IST2014-07-07T02:28:17+5:302014-07-07T02:35:09+5:30
राज्याचे चित्र : एकाकडेच परवाना तरीही स्पाच्या नावाखाली सुळसुळाट

९९ टक्के मसाज पार्लर बेकायदा
वासुदेव पागी-पणजी : गोव्यात सध्या बेकायदेशीर मसाज पार्लरांचा सुळसुळाट सुरू आहे. सरकारी माहितीनुसार एकूण ९९ टक्क्यांवर मसाज पार्लर बेकायदा आहेत; कारण कायदेशीर परवाना असलेले एकच पार्लर गोव्यात आहे.
एका सर्वेक्षणानुसार गोव्यात सुमारे १७० मसाज पार्लर आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या नोंदीनुसार केवळ एक मसाज पार्लरला परवाना दिल्याची माहिती आरोग्य खात्याचे उपसंचालक जुझे डिसा यांनी दिली. हे पार्लरही दक्षिण गोव्यात माजोर्डा येथे आहे. परवाने दिलेल्या पार्लरची नोंद आरोग्य खात्याकडे आहे. मागील विधानसभा अधिवेशनात याविषयी सविस्तर माहिती दिली होती. त्यामुळे उर्वरित ९९ टक्क्यांवर पार्लर ही कोणत्याही परवान्याशिवाय चालत असल्याचे स्पष्ट होते.
चेहऱ्याला हलकी मसाज देणारी स्पा केंद्रे गोव्यात खूप आहेत. त्यातील ६४ केंद्रांची आरोग्य खात्यात नोंदणी आहे, असे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. गुन्हा अन्वेषण विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्पा म्हणून नोंदणी करून तेथे मसाज केंद्रे चालविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. सीआयडीच्या छाप्यातून अनेकवेळा हे प्रकार उघडकीस आले आहेत. हा प्रकार बेकायदा आहे.
मसाज ही आयुर्वेदिक उपचारपद्धती आहे. विशेषत: वातनाशक म्हणून या उपचारपद्धतीकडे पाहिले जाते. त्यासाठी विशेष पद्धतीचे प्रशिक्षणही घ्यावे लागते; परंतु गोव्यातील मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिला, पुरुषांजवळ कोणत्याही अधिकृत शिक्षणाचे प्रमाणपत्र नाही. पोलिसांकडून जेव्हा छापे टाकले जातात, तेव्हा ताब्यात घेतलेल्या महिला आणि पुुरुषांकडेही पोलिसांकडून मसाज प्रशिक्षणाचा अधिकृत दाखला मागितला जातो. हा दाखला त्यांच्याकडे नसतो. सीआयडीच्या छाप्यात ताब्यात घेतलेल्या महिलांकडेही अशी प्रमाणपत्रे नव्हती.
ही मसाजची बदनामी
मसाजच्या नावाने काहीही खपविले जाते, ही बदनामी असल्याचे आयुर्वेदिक वैद्य दिवाकर वेळीप यांचे म्हणणे आहे. प्रत्येक माणसाची प्रकृती, व्याधी पाहून मसाज द्यायचा असतो. त्यासाठी आयुर्वेदाची माहिती हवी. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आयुर्वेदात ‘क्रॉस मसाज’ पद्धती म्हणजे पुरुषांना महिलांनी आणि महिलांना पुरुषांनी मसाज देण्याची पद्धत नाही, असे ते म्हणाले.