८४ कोटींच्या मिरामार रस्त्याला तडे

By Admin | Updated: November 14, 2015 01:52 IST2015-11-14T01:49:08+5:302015-11-14T01:52:23+5:30

पणजी : सुमारे चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्चाच्या मिरामार-दोनापावल या काँक्रिट रस्त्याला तडे पडल्यामुळे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी

The 84 million Miyaram road stalled | ८४ कोटींच्या मिरामार रस्त्याला तडे

८४ कोटींच्या मिरामार रस्त्याला तडे

पणजी : सुमारे चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्चाच्या मिरामार-दोनापावल या काँक्रिट रस्त्याला तडे पडल्यामुळे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. या रस्त्याच्या कामाची व पडलेल्या तड्यांची मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पाहणी केली व सविस्तर अहवाल सादर करण्यास त्यांनी मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांना सांगितले.
मिरामार-दोनापावल हा काँक्रिटचा रस्ता आहे. अजून या रस्त्याचे उद््घाटनही झालेले नाही. तत्पूर्वीच रस्त्याला तडे पडल्याने मुख्यमंत्र्यांनी पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर तसेच साधनसुविधा विकास महामंडळाचे चेअरमन प्रमोद सावंत यांच्यासमवेत रस्त्याची पाहणी केली. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिग्जही त्या वेळी उपस्थित होते.
कोट्यवधी रुपये पाण्यात?
मिरामार-दोनापावल रस्त्याच्या काँक्रिटीकरणावर ८४ कोटी ६३ लाख रुपये खर्च केले. हा खर्च वाया गेल्याची भावना व्यक्त होत आहे. २0१४ मध्ये जानेवारीत १ कोटी ६३ लाख रुपये खर्चून या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण केले होते. त्यानंतर दोन महिन्यांतच रस्ता फोडून काँक्रिटीकरण हाती घेतले.
याचिका दाखल; पण...
आयरिश यांनी या रस्त्याबाबत गेल्या वर्षी हायकोर्टात जनहित याचिकाही सादर केली होती. मात्र, सरकारनेहा रस्ता पणजी शहराच्या मास्टर प्लॅनचा भाग असल्याचा दावा केल्याने ही याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आली.
चौकशी वर्षापूर्वी व्हायला हवी होती : फुर्तादो
माजी महापौर तथा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली. चौकशी एक वर्षापूर्वी व्हायला हवी होती. तरीही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आता लक्ष घातले आहे ही चांगली बाब आहे. सत्य बाहेर येऊ द्या. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री असताना गरज नसताना हा रस्ता फोडून विद्यार्थी, पालक, वाहनधारकांना त्रास दिला. लोकांची वाहने बाद झाली आणि पर्रीकर आता आपण स्वत: गोवा-दिल्ली वाऱ्या करीत आहेत. पणजीतील जेटीच्या बांधकामाचा प्रश्नही उपस्थित करून फुर्तादो यांनी ही जेटी कोणासाठी, असा सवाल केला. कंत्राटदाराला आणखी पैसे देऊ नयेत तसेच निकृष्ट दर्जाचे काम थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मलनिस्सारण वाहिनीच नव्हती
मिरामार-दोनापावल रस्त्याच्या कडेने अगोदर मलनिस्सारण वाहिनीच नव्हती. तिथे वाहिनी घालावी लागली; कारण त्या पट्ट्यात अनेक वर्षांत पंधरा हजार फ्लॅट्स उभे राहिले आहेत. शिवाय मिरामारच्या हायस्कूलमध्ये दोन-तीन हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्या सर्वांसाठी म्हणून मलनिस्सारण वाहिनीची गरज होती, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिग्ज यांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: The 84 million Miyaram road stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.