प्रशांत नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मडकई : विविध प्रकल्पांसाठी खोदलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्याने अशा रस्त्यांवरून ये-जा करताना लोकांची होणारी जीवघेणी कसरत एका आजीच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे ८० वर्षाच्या द्रौपदी नाईक या आजीने स्वतःच हातात फावडे घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. संबंधित कंत्राटदार व या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभाराला मात्र ही चपराकच म्हणावी लागेल.
आडपई ते दुर्भाटपर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी या परिसरातील रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले. त्यानंतर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ठेकेदाराने रस्ते बुजवण्याचे काम अर्धवट ठेवल्याने लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यांना काय वाटेल?
कंत्राटदार, अधिकाऱ्यांनी आपल्या कामाकडे डोळेझाक केली म्हणून आपण हातावर हात धरून फक्त नावे ठेवत बसायचे का? चतुर्थीचा सण तोंडावर आला आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणारी आपली मुले या सणासाठी जेव्हा गावात येतील तेव्हा गावातील रस्त्यांची ही अवस्था पाहून त्यांना काय वाटेल? असा उलट प्रश्नच द्रौपदी नाईक यांनी लोकांना विचारला आणि त्या पुन्हा खड्डे बुजविण्याच्या कामाला लागल्या.
श्रमदानाची चर्चा
द्रौपदी नाईक यांनी हातात फावडे घेऊन खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्यानंतर गावकऱ्यांनी प्रशासनावर टीका केली. त्याच वेळी आर्जीच्या कृतीची प्रेरणा घेऊन सरपंच, उपसरपंच, पंचायत मंडळ, गावातील सामाजिक संघटना, गणेश मंडळे यांनी एकत्रित येऊन श्रमदानातून गावातील रस्त्यांची डागडुजी करण्याची चर्चा सुरू झाली. यावेळी चतुर्थीपूर्वी गावातील रस्ते चकाचक करण्याचा मनोदय द्रौपदी नाईक यांनी व्यक्त केला.