लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवासायबर क्राइम पोलिस स्थानकाने एका मोठ्या 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्याचा छडा लावला आहे. काणकोण तालुक्यातील आगस-लोलये येथील ५९ वर्षीय महिलेची ८० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला नागपूर येथून अटक केली. आनंदकुमार दनुराम वर्मा असे संशयिताचे नाव असून तो अवघ्या १९ वर्षांचा आहे.
आपण सक्तवसुली खात्याचा (इडी) अधिकारी बोलत असल्याचे सांगून त्याने पीडितेला मोठी रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडले. या संशयिताने पीडित महिलेशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. 'तुमच्याविरुद्ध हिंदू धर्म आणि भारत सरकारविरुद्ध आक्षेपार्ह संदेश पाठवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे सांगून धमकावले. या महिलेला तुमच्या आधार कार्डचा वापर बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असलेला मोबाइल नंबर जारी करण्यासाठी करण्यात आला होता. त्यामुळे 'डिजिटल' अटक करण्यात आली आहे असे सांगितले.
जर विशिष्ट खात्यांमध्ये ८० लाख रुपये हस्तांतरित केले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी या महिलेला देण्यात आली. पीडित महिलेने घाबरून संशयिताने सांगितलेल्या खात्यांमध्ये पैसे जमा केले. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने तक्रार दाखल केली.
पोलिस निरीक्षक शेर्विन डिकोस्टा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयित वर्मा याचा नागपूरला शोध घेतला आणि त्याला अटक केली. तपासादरम्यान, वर्मा याने जोडलेल्या खात्यांमध्ये पैसे मिळाल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले. त्याला पोलिस कोठडी मिळाली आहे. सायबर क्राइम पोलिस स्टेशनचे पीआय दीपक पेडणेकर यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.