गोव्यातील जगलांमध्ये ७७ बिबटे
By किशोर कुबल | Updated: March 1, 2024 18:01 IST2024-03-01T18:01:22+5:302024-03-01T18:01:35+5:30
चार वर्षांत संख्या दहा टक्क्यांनी घटली. केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाच्या अहवालात स्पष्ट.

गोव्यातील जगलांमध्ये ७७ बिबटे
पणजी : गोव्यात बिबट्यांची संख्या चार वर्षांत दहा टक्क्यांनी घटली असल्याचे केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार २०१८ ते २०२२ या चार वर्षांत गोव्यातील बिबट्यांची संख्या दहा टक्क्यांनी कमी झाली. या उलट राष्ट्रीय स्तरावर बिबट्यांचे प्रमाण मात्र आठ टक्क्यांनी वाढले आहे. अहवालानुसार २०२२ मध्ये गोव्यात बिबट्याची अंदाजे संख्या ७७ वर आली. २०१८ मध्ये ही संख्या ८६ होती. योगायोगाने, देशभरात बिबट्याच्या संख्येत ८ टक्के वाढ झाली आहे. २०१८ मध्ये अंदाजे १२,८५२ बिबटे देशभरात होते. ती आता अंदाजे २३,८७४ वर पोचली आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतातील बिबट्यांच्या स्थितीवरील हा अहवाल जाहीर केला. अहवालात म्हटल्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये देशात सर्वाधिक ३,९०७ बिबटे आहेत. २०१८ मध्ये ही संख्या ३,४२१ होती. शेजारी महाराष्ट्रात २०१८ साली १,६९० बिबटे होते. ही संख्या २०२२ मध्ये १९८५ झाली. कर्नाटकात २०१८ साली १,७८३ बिबटे होते २०२२ साली ही संख्या १,८७९ वर पोचली. तामीळनाडूत २०१८ मध्ये ८६८ बिबटे होते. २०२२ साली ही संख्या १,०७० झाली.
मध्य भारतात बिबट्याची स्थिर किंवा थोडीशी वाढणारी दर्शविते. २०१८ मध्ये मध्य भारतात ८,०७१ बिबटे होते. २०२२ मध्ये ही संख्या ८,८२० वर पोचली. शिवालिक टेकड्या आणि इंडो-गंगेच्या क्षेत्रात बिबट्यांच्या संख्येत घट झाली आहे. आंध्र प्रदेशमधील नागार्जुनसागर श्रीशैलम हे व्याघ्र प्रकल्प किंवा बिबट्याची सर्वाधिक संख्या असलेले ठिकाण आहे.
दरम्यान, गोव्यात बिबटे भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीमध्ये येतात व बळी पडतात. अनेकदा शिकारीसाठी लावलेल्या फासात ते अडकतात व त्यांचा बळी जातो.