बायणा येथील ७० घरे जमीनदोस्त
By Admin | Updated: July 12, 2014 01:45 IST2014-07-12T01:45:13+5:302014-07-12T01:45:23+5:30
वास्को : दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार बायणा समुद्रकिनाऱ्यावरील सुमारे ७० हून अधिक घरे जमिनदोस्त करण्यात आली़

बायणा येथील ७० घरे जमीनदोस्त
वास्को : दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार बायणा समुद्रकिनाऱ्यावरील सुमारे ७० हून अधिक घरे जमिनदोस्त करण्यात आली़ या वेळी एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून स्थगिती आदेश मिळविल्याने घरे पाडण्याचे काम थांबवावे लागले़ त्यामुळे ५० हून अधिक घरमालकांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे़
शुक्रवारी करण्यात आलेली ही कारवाई लवकर पूर्ण करण्यासाठी २०० पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता़ ही घरे वाचविण्यासाठी गोवा खंडपीठात कोणीतरी याचिका सादर करून स्थगिती मिळण्याची शक्यता असल्याने स्थगिती आदेश घेण्यापूर्वी जास्तीत जास्त घरे पाडण्यात यावी यासाठी सरकारने सकाळी ८ वा. कारवाईला सुरुवात करण्यात आली़
बायणा किनाऱ्याजवळची बांधकामे भरती रेषेपर्यंत आल्याने जिल्हाधिकारी फुर्तादो यांनी ही बांधकामे २४ तासांच्या आत खाली करण्याचे आदेश दिले होते; परंतु तेथील नागरिकांनी २४ वर्षांपेक्षा अधिक काळापासून वास्तव्य करत असल्याचा दावा करून घरे खाली करण्यास नकार दिल्यामुळे ही करावाई करण्यात आली़
पहाटे सात वाजल्यापासून पोलीस अधिकारी संपूर्ण पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले़ सकाळी ८ वा. मामलेदार लक्ष्मीकांत देसाई यांनी ध्वनिक्षेपकावरून घरमालकांना आवाहन करत चिखली मैदान, टिळक मैदान व कुठ्ठाळी गोदामामध्ये पुनर्वसनाची व्यवस्था केल्याचे सांगितले़ तसेच त्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची सूचनाही त्यांनी केली़ यावेळी कोणीही जाण्यास तयार नसल्याचे पाहून ९ वाजता जेसीबीच्या साहाय्याने बायणा शौचालयाकडून कारवाई सुरू केली़
या वेळी उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर, उपअधीक्षक लॉरेन्स डिसोझा, निरीक्षक सागर एकोस्कर, निरीक्षक संतोष देसाई, वेर्णाचे निरीक्षक विश्वेश कर्पे, रवी देसाई, राम आसरे, राजू राऊत देसाई तसेच पोलीस उपस्थित होते़ सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते व पालिका कर्मचारी यांनी कारवाईमध्ये भाग घेतला़
दरम्यान, येथील नागरिक यमनप्पा मदार यांनी अॅड़ यमन सौझा यांच्या सहकार्याने गोवा खंडपीठात धाव घेऊन ११़३०च्या सुमारास स्थगिती मिळवली़ त्यानंतर ही कारवाई रोखण्यात आली़ जिल्हाधिकऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई बुधवारपर्यंत स्थगित केली आहे़ त्यामुळे ६ बांधकामे व एक यल्लमा देवीचे मंदिर कारवाईपासून बचावले़ (प्रतिनिधी)