लालफितीत अडकले राज्याचे ५३ प्रकल्प
By Admin | Updated: November 3, 2015 02:13 IST2015-11-03T02:13:33+5:302015-11-03T02:13:45+5:30
पणजी : सरकारच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने यापूर्वी मंजूर केलेले विविध प्रकारचे ५३ प्रकल्प अजूनही मार्गी लागलेले नाहीत. लालफितीच्या कारभारात व तांत्रिक अडथळ्यांमध्ये हे

लालफितीत अडकले राज्याचे ५३ प्रकल्प
पणजी : सरकारच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने यापूर्वी मंजूर केलेले विविध प्रकारचे ५३ प्रकल्प अजूनही मार्गी लागलेले नाहीत. लालफितीच्या कारभारात व तांत्रिक अडथळ्यांमध्ये हे प्रकल्प अडून राहिले आहेत. येत्या आठ दिवसांत या सगळ्या प्रकल्पांची सद्यस्थिती व त्यांच्यासमोरील अडचणी याविषयी आपल्याला सविस्तर माहिती द्या, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या मंडळाच्या सातत्याने बैठका होत आहेत. बैठकीत अनेक प्रकल्प मंजूरही केले जातात; पण हे प्रकल्प प्रत्यक्षात उभे राहिलेले नाहीत. काही प्रकल्पांना जमिनीच्या वापरात बदल करून हवा असतो. झोनिंग बदलावे लागते. सध्या प्रादेशिक आराखडाही अस्तित्वात नाही. काही प्रकल्पांना एफएआर वाढवून हवा असतो. या सगळ्या कारणांमुळे प्रकल्पांच्या फाईल्स येथून तिथे फिरत असतात. इको-टुरिझम व तत्सम प्रकल्प मार्गी लागण्याबाबतही अडचणी येत आहेत.
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळावर विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी असतात;
पण मंडळाने मंजूर केलेले प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावण्यापूर्वी बरेच कायदेशीर सोपस्कार पार पाडावे लागतात. काही प्रॅक्टिकल समस्या उद्भवतातच, असे
सूत्रांनी सांगितले. मंडळाने मंजूर केलेले प्रकल्प उभे राहिल्यानंतर हजारो रोजगार
संधी निर्माण होणार आहेत. (खास प्रतिनिधी)