गोव्यातील ५१ अमरनाथ यात्रेकरु काश्मिरात अडकले
By Admin | Updated: July 10, 2016 20:26 IST2016-07-10T20:26:54+5:302016-07-10T20:26:54+5:30
अमरनाथला गेलेले गोव्याचे ५१ यात्रेकरु तेथील हिंसाचारामुळे गेले तीन दिवस काश्मिरमध्ये अडकून पडले आहेत. यात चार कुटुंबांसह १५ वर्षीय मुलाचाही समावेश आहे.

गोव्यातील ५१ अमरनाथ यात्रेकरु काश्मिरात अडकले
- चार कुटुंबांसह १५ वर्षीय मुलाचाही समावेश
पणजी : अमरनाथला गेलेले गोव्याचे ५१ यात्रेकरु तेथील हिंसाचारामुळे गेले तीन दिवस काश्मिरमध्ये अडकून पडले आहेत. यात चार कुटुंबांसह १५ वर्षीय मुलाचाही समावेश आहे.
काश्मिरात दहा हजाराहून अधिक यात्रेकरु अडकल्याचे सांगितले जाते. गोव्याचे ५१ यात्रेकरु सध्या श्रीनगर येथे बस डेपोत आश्रयाला असून तेथे लष्कराकडून सुरक्षेचा पूर्ण बंदोबस्त करण्यात आलेला आहे. दिल्लीतील यात्रेकरुंचा भंडारा तेथे चालू असून तेथेच गोव्याचे हे यात्रेकरु भोजन घेत आहेत. काश्मिरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा कमांडर बरहान वानी याला ठार केल्यानंतर उसळलेल्या दंगलीत यात्रेकरुंच्या वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडलेले आहेत. सर्व रस्ते बंद झालेले आहेत. बस डेपो सोडून बाहेर जाण्यास लष्कराची परवानगी नाही. पुढेही जाऊ शकत नाही आणि मागेही अशा स्थितीत
गोव्याचे हे यात्रेकरु अडकलेले आहेत.
उदय पेडणेकर, शिवराम गांवकर,भरत कावा, बेहराम चौधरी, शंतनू गौशियन, सुबोध आमोणकर, अनिल राजपुरोहित, कानाराम चौधरी, वल्लभ नाईक आदी गोमंतकीय यात्रेकरुंचा समावेश आहे.
भाविक अडकल्याचे वृत्त रविवारी गोव्यात वाऱ्यासारखे पसरले आणि येथील नातेवाईकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी मोबाइलवरुन संपर्क साधून विचारपूस केली. अडकलेल्यांशी रेंजअभावी संपर्क होत नव्हता त्यामुळे नातेवाईकांच्या चिंतेत आणखी भर पडली.
खासदार सावईकर यात्रेकरुंच्या संपर्कात
दरम्यान, श्रीनगरमध्ये अडकलेले गोमंतकीय यात्रेकरु सुखरुपरित्या परत यावेत यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर जातीने लक्ष ठेवून आहेत. संरक्षण मंत्रालय माहिती घेत आहे. आपणही याबाबतीत यात्रेकरुंशी संपर्क साधून ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्याची कल्पना त्यांना दिलेली आहे, असे सायंकाळी उशिरा दक्षिण गोव्याचे लोकसभा खासदार नरेंद्र सावईकर यानी स्पष्ट केले.