विदेशात रोड शोवर उधळले ४२ कोटी
By Admin | Updated: March 25, 2015 01:39 IST2015-03-25T01:36:50+5:302015-03-25T01:39:54+5:30
पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांची कोंडी केली. हा मोठा घोटाळा असल्याचा दावा करून या प्रकरणात चौकशीची मागणीही विरोधकांनी केली.

विदेशात रोड शोवर उधळले ४२ कोटी
पणजी : विदेशात रोड शोच्या नावावर पर्यटन खात्याकडून तीन वर्षांत ४२ कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा, तसेच यापूर्वी सभागृहात हमी दिल्याप्रमाणे रोड शोचे प्री आॅडिट न केल्याच्या मुद्द्यावरून अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांची कोंडी केली. हा मोठा घोटाळा असल्याचा दावा करून या प्रकरणात चौकशीची मागणीही विरोधकांनी केली.
विदेशी पर्यटक गोव्यात यावेत, यासाठी पर्यटन खात्याकडून विविध देशांत रोड शोंचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोसाठी सरकारकडून तीन वर्षांत ४२ कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचे माहिती हक्काद्वारे मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचे आमदार सरदेसाई यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. तसेच आपण विचारलेल्या यासंबंधीच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तर न देता माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
रोड शोवर ४२ कोटी रुपये खर्च केल्याचे पर्यटनमंत्र्यांनी मान्य केले; परंतु हा व्यर्थ खर्च असल्याचा सरदेसाई यांचा दावा फेटाळला. २०१४ या वर्षी विदेशातून १.४० लाख पर्यटक आल्याचे त्यांनी सांगितले; परंतु या संख्येत जुने गोवे येथील सेंट झेवियरच्या शवदर्शनासाठी आलेल्या लोकांची संख्या मिळवून मंत्री सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
२०१४-१५ या वर्षीच सरकारने ७ देशांत रोड शो आणि ट्रॅव्हल मार्ट करून जवळजवळ ८ कोटी रुपयांची उधळपट्टी केली असल्याचे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले. त्यात इस्तंबुल, रशिया, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, नेदरलँड आणि इटली या देशांचा समावेश आहे. त्यात रशिया वगळता इतर देशांतून गोव्यात क्वचित पर्यटक येतात. त्यातही रशियन पर्यटक यंदा घटले आहेत. त्यामुळे सरकारने गुंतवणूक म्हणून केलेला खर्च हा किती न्याय्य आहे, याचाही अभ्यास न केल्याचे स्पष्ट झाले.
‘प्री आॅडिट’ ही संकल्पना माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याच सभागृहात १४ मार्च २०१४ रोजी मांडली होती. ‘पर्यटन खात्याचे प्रकल्प सुरू करण्यापूर्वीच त्याचे प्री आॅडिट करून एकूण गुंतवणुकीवर किती लाभ होईल, याचा अंदाज घेतला जाईल. प्रकल्प फायदेशीर आहे असे वाटल्यासच तो हाती घेतला जाईल, असे पर्रीकर यांनी सांगितले होते,’ असे सरदेसाई यांनी सभागृहात सांगितले. हे त्यांनी केव्हा सांगितले होते, याचा तारखेसह उल्लेख करूनही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्याला तसे काही सांगितल्याचे आठवत नाही, असे सांगितले.
(प्रतिनिधी)