सरकारी कार्यालयांमध्ये ४० अधिकाऱ्यांकडून ‘छापे’
By Admin | Updated: December 11, 2015 00:22 IST2015-12-11T00:21:57+5:302015-12-11T00:22:53+5:30
राज्यातील बाराही तालुक्यांतील गटविकास अधिकारी (बीडीओ), मामलेदार, जिल्हाधिकारी, नगर नियोजन अशा अनेक

सरकारी कार्यालयांमध्ये ४० अधिकाऱ्यांकडून ‘छापे’
राज्यातील बाराही तालुक्यांतील गटविकास अधिकारी (बीडीओ), मामलेदार, जिल्हाधिकारी, नगर नियोजन अशा अनेक कार्यालयांमध्ये गुरुवारी सुमारे ४0 अधिकाऱ्यांनी ‘छापे’ टाकले व कार्यालयांचा पंचनामाच केला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता पर्वरी येथील मंत्रालयात या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन पंचनाम्याचा आढावा घेणार आहेत.
सरकारने यापूर्वी अनेक सेवा कालबद्ध केल्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी मोठा गाजावाजा करत त्याबाबतचे अहवालही यापूर्वी तयार केले व लोकांची कामे आता अत्यंत जलदगतीने होतील, असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात सरकारी कार्यालयांमध्ये लोकांना कसा अनुभव येतो व साध्या साध्या कामांच्या अर्जांवरही दीर्घकाळ कसे निर्णय होत नाहीत, याची कल्पना सरकारला आली आहे. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बाराही तालुक्यांतील सर्व महत्त्वाच्या कार्यालयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकांनी अचानक भेट द्यावी, अशी योजना बुधवारी आखली. ज्येष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत प्रत्येकी तीन किंवा चार कनिष्ठ श्रेणीतील अधिकारी घ्यावेत व या पथकांनी गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता बाराही तालुक्यांतील सरकारी कार्यालयांमध्ये अचानक जावे आणि कोणता कर्मचारी कोणत्या वेळी कामावर आला, त्याने काय काम केले, किती अर्ज प्रलंबित आहेत किंवा कोणती समस्या सुटलेली नाही, कोणते संगणक व अन्य उपकरणे चालतात वगैरेचा आढावा घ्यावा, अशी सूचना केली. दिवसभर या पथकांनी कार्यालयात थांबावे, मस्टर रोलच्याही झेरॉक्स प्रती आणाव्यात, असे अधिकाऱ्यांच्या पथकांना सांगण्यात आले.
गुरुवारी सकाळपासून मुख्यमंत्र्यांच्या या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. बीडीओ, मामलेदार, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी अशा अनेक कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जाऊन बसले आणि कार्यालयातील कामकाजाच्या नोंदी तसेच अन्य माहिती गोळा केली.