पणजी : सुमारे १०० वैद्यकीय सुविधांसाठी मेडिक्लेमची सुविधा देणाऱ्या ‘दीनदयाळ स्वास्थ्य सेवा’ योजनेसाठी आरोग्य खात्याने निविदा जारी केल्या आहेत. २.५ लाख रुपये आणि ४ लाख रुपयांपर्यंतच्या विमा देणाऱ्या या योजनेसाठी प्रत्येक कुटुंबाला अनुक्रमे २००रुपये आणि ३०० रुपये वार्षिक हप्ता असेल. दोन वर्षे प्रतीक्षा असलेल्या दीनदयाळ स्वास्थ्य योजनेसाठी सरकारने निविदा जारी केली आहे. बोलीपूर्वीची चर्चा १२ सप्टेंबर २०१४ रोजी सचिवालयात होणार आहे. त्याच दिवशी तांत्रिक बोलीसाठी निविदा खुली होणार आहे. आर्थिक बोलीसाठी निविदा १५ आॅक्टोबर रोजी खुली होणार आहे. एखाद्याला सद्यस्थितीत कोणतीही व्याधी जडलेली असली, तरीही या योजनेचा लाभ त्याला घेणे शक्य आहे. गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याला एटीएमच्या आकाराचे स्मार्ट कार्ड करावे लागणार आहे. हे संबंधित कार्ड विमा कंपनीकडून पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनी १०० रुपयांपर्यंत शुल्क आकारू शकते, असे योजनेत म्हटले आहे. कार्डची वैधता ३१ मार्च २०१६ पर्यंत राहील. त्यानंतर वैधता संपण्यापूर्वी नूतनीकरण करावे लागेल. चालक परवाना, पासपोर्ट, रेशन कार्ड, बँक खाते यापैकी कोणतेही कागदपत्र हे कार्ड मिळविण्यासाठी पात्रता धरण्यात येणार आहे. अर्जदार किमान पाच वर्षे गोव्यात राहणारा असला पाहिजे. ही योजना २०२० सालापर्यंत करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत तीन आणि त्यापेक्षा कमी सदस्य असलेल्या कुटुंबासाठी २.५ लाख रुपयांपर्यंत विमा आणि ४ किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबासाठी ४ लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षा मिळणार आहे. ३ पेक्षा कमी सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाकाठी २०० रुपये हप्ता (प्रीमियम) असेल, तर ४ आणि अधिक संख्या असलेल्या कुटुंबासाठी ३०० रुपये असेल. अनुसूचित जाती जमाती, सधन गटात न येणारे इतर मागासवर्गीय आणि विशेष क्षमतेच्या लोकांसाठी त्यात ५० टक्के सवलत असेल. (प्रतिनिधी)
४ लाखांचा आरोग्य विमा ३०० रुपयांत
By admin | Updated: August 27, 2014 01:31 IST