विदेशींच्या आणखी ३६ मालमत्ता धोक्यात

By Admin | Updated: June 21, 2014 01:44 IST2014-06-21T01:41:14+5:302014-06-21T01:44:08+5:30

पणजी : ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन करून विदेशींनी गोव्यात ज्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत,

36 more threats to foreigners | विदेशींच्या आणखी ३६ मालमत्ता धोक्यात

विदेशींच्या आणखी ३६ मालमत्ता धोक्यात

पणजी : ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन करून विदेशींनी गोव्यात ज्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत, त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाची प्रक्रिया आता अधिक वेग घेऊ लागली आहे. २२ मालमत्ता यापूर्वी जप्त केल्यानंतर आता आणखी ३६ प्रकरणी विदेशी नागरिकांना संचालनालयाने नोटीस पाठवली आहे. फेमाचे उल्लंघन स्पष्ट झाले तर या ३६ मालमत्तांवरही टाच येऊ शकते.
अंमलबजावणी संचालनालयाचे येथील कार्यालय विविध बाबतीत सक्रिय झाले आहे. काही वर्षांपूर्वी ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन करून व रिझर्व्ह बँकेचीही मान्यता न घेता ब्रिटिश, रशियन व अन्य नागरिकांनी गोव्यात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी व अन्य मालमत्ता खरेदी केल्या. या मालमत्तांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने विदेशी नागरिकांना नोटिसा पाठवून सुनावणी घेण्याचे काम सुरू केले आहे.
आतापर्यंत बावीस प्रकरणी सुनावणी पूर्ण होऊन विदेशी नागरिकांच्या पेडणे, बार्देस तालुक्यातील किनारी भागातील एकूण २२ मालमत्ता जप्तही करण्यात आल्या. सर्वात मोठी मालमत्ता मोरजी किनाऱ्याच्या जवळ जप्त करण्यात आली आहे. ती जमीन सुमारे १९ हजार चौरस मीटरची आहे. या कारवाईस काहीजणांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे त्या मालमत्तेचा तूर्त लिलाव करता येत नाही.
आणखी ३६ मालमत्तांबाबत संचालनालयाने नोटिसा जारी केल्या आहेत. त्याबाबत सुनावणी सुरू झाली आहे. चौकशीअंती या ३६ जागांवर टाच येण्याची शक्यता आहे. ‘फेमा’ कायद्याचे या ३६ प्रकरणी उल्लंघन झाले आहे काय, या दृष्टिकोनातून चौकशी केली जात आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: 36 more threats to foreigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.