मुदतवाढीवरील ३६ अधिकाऱ्यांची ‘घर वापसी’
By Admin | Updated: October 23, 2015 02:00 IST2015-10-23T02:00:04+5:302015-10-23T02:00:15+5:30
पणजी : निवृत्त होऊनही केवळ मुदतवाढीवर असलेल्या ३६ अधिकाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांत घरी जावे लागले आहे. वीज खात्याचे मुख्य अभियंता एस. लक्ष्मणन, कृषी संचालक

मुदतवाढीवरील ३६ अधिकाऱ्यांची ‘घर वापसी’
पणजी : निवृत्त होऊनही केवळ मुदतवाढीवर असलेल्या ३६ अधिकाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांत घरी जावे लागले आहे. वीज खात्याचे मुख्य अभियंता एस. लक्ष्मणन, कृषी संचालक ओर्लांद रॉड्रिग्स, वाणिज्य कर खात्याचे आयुक्त एस. जी. कोरगावकर, पशुसंवर्धन खात्याचे संचालक बेंजामिन ब्रागांझा आदी खातेप्रमुखांसह अभियंते तसेच अन्य अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. आणखी सेवावाढ न देता सरकारने या अधिकाऱ्यांना घरी पाठविले आहे.
वीज खात्यात मुख्य अभियंत्यासह १९ अधिकारी मुदतवाढीवर होते. त्यातील १७ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. कृषी खात्यात संचालकासह ११ अधिकारी मुदतवाढीवर होते. पैकी ९ जणांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. सर्व खात्यांमध्ये मिळून शिपायापासून अभियंता, संचालकांपर्यंत मुदतवाढीवर असलेल्या ९५ अधिकाऱ्यांची यादी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने तयार केली असून या सर्वांविरुद्ध आंदोलन सुरू आहे.
संघटनेचे अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी याचे श्रेय संघटनेच्या आंदोलनाला दिले आहे. मुदतवाढीवरील अधिकाऱ्यांविरुद्ध संघटनेने १५ आॅगस्टपासून अभिनव आंदोलन सुरू केले आहे. सेवावाढीवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलक प्रतिमा घेऊन येतात आणि प्रतिमेचा उपहासात्मक सत्कार करतात. संबंधित अधिकाऱ्याला बाहेर येण्याचे आणि त्याने खुर्ची सांभाळण्यासाठी काय काय केले हे जनतेला सांगावे, असे आवाहन केले जाते. या आंदोलनाने मुदतवाढीवरील अधिकाऱ्यांनीही धसका घेतला आहे.
मुदतवाढीवर असलेल्या ९५ अधिकाऱ्यांची जी यादी संघटनेने तयार
केली आहे, त्यात वेगवेगळ्या सरकारी खात्यांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांत २0 खात्यांसमोर निदर्शने
करण्यात आली. यात सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, भू सर्वेक्षण, शिक्षण, सहकार,
उच्च शिक्षण, प्रोव्हेदोरिया, सर्व शिक्षा अभियान, वीज आदी खात्यांचा समावेश आहे. सायंकाळी ४.३0 नंतर आंदोलक संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जमतात आणि उपहासात्मक पद्धतीने निदर्शने करतात. (पान २ वर)