३५ हजार नागरिक एकत्र करणार विक्रमी योग!
By Admin | Updated: June 21, 2015 02:33 IST2015-06-21T02:32:41+5:302015-06-21T02:33:07+5:30
पस्तीस हजार भारतीयांनी एकाच ठिकाणी एकत्र येऊन योगा करणे हा जगातील पहिला प्रयोग आहे, असे केंद्रीय आयुष खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी सांगितले.

३५ हजार नागरिक एकत्र करणार विक्रमी योग!
सद्गुरू पाटील ल्ल पणजी
पस्तीस हजार भारतीयांनी एकाच ठिकाणी एकत्र येऊन योगा करणे हा जगातील पहिला प्रयोग आहे, असे केंद्रीय आयुष खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी सांगितले.
दिल्लीहून दूरध्वनीवरून खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी श्रीपाद नाईक म्हणाले, की दिल्लीत राजपथावर आम्ही ३५ हजार लोकांची योग कार्यक्रमासाठी व्यवस्था केली आहे. त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आता इच्छुकांची गर्दी वाढली आहे. ऐनवेळी आम्ही आणखी व्यवस्था करू शकत नाही. तरीही बरीच तयारी केली असून एक वेगळाच माहोल दिल्लीत व देशभर निर्माण झाला आहे. ३५ हजारांवरून ३८ हजारांपर्यंत संख्या जाईल, असे वाटले होते. प्रत्यक्षात आता ४० हजार लोक राजपथावरील योग कार्यक्रमात सहभागी होऊ पाहात आहेत.
नाईक म्हणाले की, योगाचे महत्त्व लोकांना पटले आहे. प्रत्येकाच्या आरोग्याच्या हितासाठी योग महत्त्वाचा आहे. राजपथावरील कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती असेल. योगगुरू रामदेवबाबा हेही उपस्थित असतील.
श्रीपाद नाईक म्हणाले, की गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या उपक्रमाची नोंद होणार आहे. त्यासाठी गिनीज बुकची टीम दिल्लीत कार्यरत झाली आहे. योगाचे महत्त्व जगातील अनेक देशांनी मान्य केले आहे. भारतातही आता कुणाच्या मनात त्याविषयी संदेह राहिलेला नाही. जगातील अनेक नामवंतांकडून योगाच्या यशोगाथा सांगितल्या जातात. योगा करण्याचा त्यांना कसा लाभ झाला ते सांगितले जाते. मात्र, भारतात व जगात कधीच कुठे ३५ हजार लोकांनी एकत्रपणे योगाची विविध आसने केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच ही घटना ऐतिहासिक आहे.
नाईक म्हणाले की, योगाचे महिनाभर प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही देशातील ६५० जिल्ह्यांमध्ये व्यवस्था केली होती. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक लाख रुपये देण्यात आले होते. या उपक्रमावर २५-३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
श्रीपाद नाईक म्हणाले, की देशातील अल्पसंख्याकांचा योगाला आक्षेप राहिलेला नाही. मुस्लिमधर्मीय बांधवांशीही आम्ही चर्चा केली आहे. कुराणात योगाला
आक्षेप नाही. आम्ही चर्चा करून शंका निरसनही केले आहे. सर्व धर्मातील लोकांचा योग उपक्रमास पाठिंबा लाभला आहे. यात सर्वांचा सहभाग असेल.