'स्वच्छ गोवा'साठी वर्षाला ३०० कोटी खर्च; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 13:24 IST2024-12-17T13:23:18+5:302024-12-17T13:24:02+5:30
पणजीत 'वाईल्ड गोवा' या पुस्तकाचे प्रकाशन

'स्वच्छ गोवा'साठी वर्षाला ३०० कोटी खर्च; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: केवळ ३७०२ चौरस किलोमीटरच्या गोव्यात आम्ही विकासाबरोबर ६५ ते ७० टक्के भाग हरित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचे जतन करणेही महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
राज्य स्वच्छ ठेवण्यासाठी दरवर्षी राज्य सरकार ३०० कोटी रुपये खर्च करत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. माहिती आणि प्रसिद्धी खात्याने पराग रांगणेकर यांच्या 'वाईल्ड गोवा' या पुस्तक प्रकाशन झाले. आयएमबीमध्ये आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
व्यासपीठावर गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम, माहिती प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, प्रा. डॉ. मनोज बोरकर व लेखक रांगणेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्यात ३६ प्रजातीचे पक्षी आढळतात. रांगणेकर यांनी व्यवस्थितरित्या या पक्षांचे फोटो व माहिती प्रसिद्ध केली आहे. गोवा हे निसर्गाने नटलेले राज्य आहे, हे यावरून दिसून येते. त्यामुळे राज्यात कुठलाही प्रकल्प आला तरी आम्ही अगोदर पर्यावरणाची बाजू पाहत असतो. म्हणून तर लहानशा गोव्यात ७ अभयारण्य आहेत आणि राज्य सरकारकडून त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे. उदरनिर्वाहासाठी विकासही महत्त्वाचा असल्याने निसर्गाचे जतन करताना खाण व्यवसाय पूर्ण बंद करा असेही म्हणता येत नाही. त्यामुळे समतोल राखून विकास केला जात आहे.
गोवा सरकार स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करते. देशातील क्वचितच राज्य स्वच्छतेसाठी इतका पैसा खर्च करत असतील. शाश्वत विकासासाठी आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करून, पश्चिम घाटातील इको सेन्सिटिव्ह क्षेत्रासाठी संमती देणारे गोवा हे पहिले राज्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
लेखक रांगणेकर म्हणाले, गेली १७ वर्षे राज्यातील विविध अभयारण्यामध्ये, डोंगर भागत फिरून मी छायाचित्रे घेतली आहे. मी नामवंत छायाचित्रकार नाही. पक्षी निरीक्षण आणि निसर्ग प्रेम यामुळे अशी आकर्षक छायाचित्रे काढता येतात. मुख्यमंत्र्यांनी मला यासाठी पाठिंबा दिला. म्हणून हे सुंदर पुस्तक तयार झाले आहे. आता राज्यातील वन्यजीव या पुस्तकासाठी अभ्यास सुरू आहे.
पंतप्रधानांकडूनही झाले कौतुक
मुख्यमंत्री म्हणाले, की रांगणेकर यांचे हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले आहे. त्यांनी या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना गोव्यात एवढ्या प्रजातीचे पक्षी आढळतात, यासाठी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी रांगणेकर यांचेही कौतुक केले आहे. माहिती आणि प्रसिद्धी खाते सर्व महाविद्यालयामध्ये हे पुस्तक मोफत देणार आहे.