लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचा राज्यभरातील ३.२ लाख लोकांना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यासंबंधी प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विभाग प्रमुख आणि तालुका नोडल अधिकाऱ्यांसोबत काल बैठक घेतली.
स्वयंपूर्ण पोर्टल आणि तालुका नोडल अधिकाऱ्यांकडून पोर्टलचा प्रभावी वापर या विषयांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचा एक भाग म्हणून यापूर्वीच ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य आणि अन्न व औषध प्रशासन शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त इतर विभाग सक्रियपणे राज्यव्यापी कार्यशाळा दौरे करत आहेत. लवकरच ग्रामपंचायत स्तरावर विविध खात्यांद्वारे शिबिरे आयोजित केली जातील. यासंबंधीचे तपशीलवार वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. या मोहिमेत उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देण्यावर तसेच स्वावलंबन साध्य करण्यासाठी लोकांना सक्षम बनविण्यावर महत्त्वपूर्ण भर दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.