क्रीडा कर्मचाऱ्यांकडून २४ तासांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 02:23 IST2016-07-05T02:20:51+5:302016-07-05T02:23:11+5:30
पणजी : आझाद मैदानावर गेले बारा दिवस नोकरीसाठी उपोषण करणाऱ्या ६३ क्रीडा खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांची

क्रीडा कर्मचाऱ्यांकडून २४ तासांची मुदत
पणजी : आझाद मैदानावर गेले बारा दिवस नोकरीसाठी उपोषण करणाऱ्या ६३ क्रीडा खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची नोकरी देण्यासाठी सरकारकडे वेळ नसून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यात व्यस्त आहेत हे आक्षेपार्ह बाब आहे, अशी टीका आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या स्वाती केरकर यांनी केली. मुख्यमंत्र्यांना शनिवारी निवेदन पत्र सादर करण्यात आले असून क्रीडा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मंगळवारपर्यंत निर्णय घेण्यात आला नाही तर आम्ही आंदोलन तीव्र
करणार, असा इशारा केरकर यांनी दिला.
सोमवारी आंदोलनकर्त्यांनी उपोषणाला बसून १२ दिवस पूर्ण झाले. आंदोलनकर्त्या महिलांची प्रकृती प्रत्येक घडीला अतिगंभीर बनत चालली आहे. मात्र, सरकारच्या एकाही आमदार, मंत्र्याला याबाबत सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. क्रीडामंत्री तवडकर हे खोटारडे असून त्यांनी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत. आता कर्मचाऱ्यांना तोंड दाखवण्याचीही त्यांना लाज वाटत असावी म्हणून ते आझाद मैदानावर येणे टाळत आहेत, असे केरकर म्हणाल्या.
आम्ही सरकारच्या डावपेचांना न घाबरता मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे केरकर म्हणाल्या. संगीता पाटील या महिलेला सोमवारी सायंकाळी डिस्चार्च दिला असून अजूनही त्यांची प्रकृती गंभीर आहे.
दोन दिवसांनी ईद सण येत असून आंदोलनकर्त्यांमध्ये बरेच मुस्लिम बंधू-भगिनी आहेत. सरकारने ईदपूर्वी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर निर्णय द्यावा, अशी मागणीही केरकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)