१७५० च्या बुटांसाठी २0 हजारांची भरपाई
By Admin | Updated: December 5, 2014 01:05 IST2014-12-05T01:05:02+5:302014-12-05T01:05:36+5:30
सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव साडेसतराशे रुपयांच्या बुटांचा परतावा देण्यास नकार दिलेल्या पणजीतील हिल्स या पादत्राणांच्या आस्थापनाला सध्या ग्राहक मंचाचा दणका सोसावा लागला आहे.

१७५० च्या बुटांसाठी २0 हजारांची भरपाई
सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव
साडेसतराशे रुपयांच्या बुटांचा परतावा देण्यास नकार दिलेल्या पणजीतील हिल्स या पादत्राणांच्या आस्थापनाला सध्या ग्राहक मंचाचा दणका सोसावा लागला आहे. या साडेसतराशेच्या बुटांसाठी पर्वरी येथील बेमविंदा डायस या महिलेला तब्बल २0 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश उत्तर गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. संजय चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली या मंचाच्या सदस्य अॅड. वर्षा बाळे यांनी २८ नोव्हेंबरला हा निकाल दिला.
या दाव्याची पार्श्वभूमी अशी : पर्वरी येथील बेमविंदा डायस यांनी हिल्स या पादत्राणांच्या दुकानातून १७५0 रुपयांचे बूट खरेदी केले होेते. मात्र, ज्या दिवशी हे बूट खरेदी केले त्याच दिवशी एका बुटाचा हिल तुटून या पादत्राणाचा कपडाही फाटला. त्यामुळे नवीन बूट देण्यात यावेत, अशी मागणी डायस यांनी या आस्थापनाकडे केली होती. मात्र, बूट बदलून न देता या आस्थापनातून ते त्यांना दुरुस्त करून देण्यात आले. मात्र, या दुरुस्तीवर खुश नसलेल्या डायस यांनी पैसे परत मागितले असता, त्यांची मागणी धुडकावून लावण्यात आली.
संतापलेल्या डायस यांनी उत्तर गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर दावा केला होता. विरोधी पक्षकार असलेल्या हिल्स या आस्थापनाला मंचाने नोटीस पाठवूनही या आस्थापनाच्या वतीने कोणीही सुनावणीस हजर न राहिल्याने शेवटी त्यांच्या अनुपस्थितीत या दाव्यावर सुनावणी घेण्यात आली.
अॅड. बाळे यांनी दिलेल्या निकालपत्रात, पहिल्याच दिवशी बूट तुटल्याने तो सदोष दर्जाचा होता हे सिद्ध होते. अशा वेळी बूट बदलून न देणे अथवा पैसे परत न करणे ही कृती म्हणजे सेवेतील कमतरता तर झालीच, त्याशिवाय बेजबाबदारपणा असल्याचे नमूद करून या महिलेला ज्या दिवशी हे बूट घेतले त्या दिवसापासून १७५0 रुपयांची रक्कम १२ टक्के व्याजाने फेडण्याबरोबरच झालेल्या मनस्तापाबद्दल १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई, तर दाव्याचा खर्च म्हणून अतिरिक्त पाच हजार रुपये देण्याचा आदेश दिला.