लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'सरकारमधील सर्व मंत्र्यांकडून लूट असून, चालली एका मंत्र्याने क्षुल्लक कामासाठी आपल्याकडून २० लाख रुपये उकळले', असा आरोप करुन खळबळ उडवून देणारे माजी मंत्री पांडुरंग मडकईकर अखेर नरमले आहेत. पत्रकारांनी या आरोपांचे पुढे काय झाले? असा प्रश्न मडकईकर यांना केला असता ते म्हणाले की, 'हा आमचा पक्षांतर्गत मामला आहे. मी केलेल्या आरोपांची दखल पक्षाने घेतली असून, या विषयावर पक्षांतर्गत चर्चा व चौकशी सुरू आहे. मी यावर जास्त बोलू इच्छित नाही.'
निवडणुकीवेळ पाहू
आगामी २०२७च्या विधानसभा तिकिटाबाबत भाजपने ठामपणे काही न सांगितल्यास आठ दिवसात पक्ष सोडण्याबाबत निर्णय घेईन, असेही मडकईकर यांनी म्हटले होते. या गोष्टीला आठ दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे आता तुमची काय भूमिका असेल, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, 'विधानसभा निवडणुकीला अजून अडीच ते तीन वर्षे आहेत. पक्ष सोडण्याबाबत सध्या तरी काही निर्णय झालेला नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय ते पाहू. कारण आगामी निवडणुकीच्या आधी काही पक्ष विलीन होऊ शकतात. त्यावेळच्या राजकीय घडामोडी पाहूनच निर्णय घ्यावा लागेल.'
भाजपने फेटाळले आरोप
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष पंधरवड्यापूर्वी गोवा भेटीवर आले असता मडकईकर यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांना भेटून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सावंत सरकारमधील सर्व मंत्री पैसे मोजण्यात व्यस्त आहेत. सर्व मंत्र्यांकडून लूट चालली आहे. एका मंत्र्याने फाइल मंजूर करण्यासाठी आपल्याकडून २० लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपावरून मंत्री, आमदार व भाजपमध्येही खळबळ माजली होती. गेल्या आठवड्यात गोव्यात आलेले पक्षाचे दुसरे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी मडकईकर यांचे आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. दरम्यान, त्या संबंधित मंत्र्याने पैसे परत केल्याची चर्चाही मध्यंतरी पसरली होती.