राज्यात २ क्लस्टर विद्यापीठे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2025 10:36 IST2025-01-15T10:35:06+5:302025-01-15T10:36:11+5:30

उत्तर व दक्षिण गोव्यात व्यवस्था

2 cluster universities in the state information from chief minister pramod sawant | राज्यात २ क्लस्टर विद्यापीठे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

राज्यात २ क्लस्टर विद्यापीठे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात दोन क्लस्टर विद्यापीठे सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. मात्र, गोवाविद्यापीठही राहणार असून नव्या विद्यापीठांमुळे राज्यात एकूण तीन विद्यापीठे असणार आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नवीन दोन विद्यापीठे ही उत्तर व दक्षिण या दोन्ही जिल्ह्यात सुरू केली जाणार आहेत. त्यांना स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा असणार आहे. क्लस्टर विद्यापीठे लवकर सुरू केली जावीत यासाठी सरकार प्रयत्नरत असून त्यासाठी प्रक्रियाही हाती घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी संपादकांशी वार्तालाप करताना सांगितले. याशिवाय राज्यात फोंडा येथे एक सायबर विद्यापीठही असून ते खासगी आहे. दोन्ही विद्यापीठांसाठी लवकरच जागाही निश्चित केली जाणार आहे. क्लस्टर विद्यापीठांमुळे शैक्षणिक क्रांती होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

२,००० विद्यार्थी समूहातील प्रमुख महाविद्यालयात असणे आवश्यक आहे. तर सहभागी होणाऱ्या सर्व महाविद्यालयात मिळून किमान ४ हजार विद्यार्थी असणे आवश्यक आहे.

राज्यातील नोकरभरती यापुढे आयोगामार्फतच होणार आहे. संगणकीय पद्धतीने एकाचवेळी किमान दहा हजार उमेदवारांची परीक्षा घेता येईल, अशी सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले डॉक्टर व इतर तज्ज्ञ कंत्राटी पद्धतीने भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता भासणार नाही.

क्लस्टर विद्यापीठ म्हणजे काय? 

अनेक महाविद्यालये एकत्र येऊन स्थापन केलेलेल्या विद्यापीठाला क्लस्टर विद्यापीठ असे म्हणतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे आणि विद्यापीठांवरील ताण कमी करणे हा क्लस्टर विद्यापीठाचा हेतू आहे.

'क्लस्टर'ची संकल्पना... 

क्लस्टर विद्यापीठांमध्ये बहुविद्याशाखीय शिक्षण दिले जाते. या विद्यापीठांमध्ये शैक्षणिक, भौतिक आणि तांत्रिक पायाभूत सुविधा असतात. स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रम तयार करणे हे या विद्यापीठांचे विशेष वैशिष्ट्य आहे. क्लस्टर विद्यापीठ जिल्हास्तरावर करायचे असेल तर त्या जिल्ह्यातील किमान तीन महाविद्यालये एकत्र येऊन ते स्थापन करता येते. या तीन महाविद्यालयापैंकी एक महाविद्यालय हे अनुदानित महाविद्यालय असणे आवश्यक आहे.

'जीआयएम'ला हवाय विद्यापीठाचा दर्जा 

पर्ये-सत्तरी येथील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (जीआयएम) या खासगी उच्च शिक्षण संस्थेने राज्य सरकारकडे विद्यापीठाचा दर्जा मागितला आहे. खुद्द मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली. 'जीआयएम'ला विद्यापीठाचा दर्जा हा सरकारकडून दिला जाऊ शकतो. कारण देशातील अवघ्या काही अग्रगण्य संस्थात जीमचा क्रमांक लागत आहे.
 

Web Title: 2 cluster universities in the state information from chief minister pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.