मगोला हव्यात १९ जागा
By Admin | Updated: February 15, 2015 01:53 IST2015-02-15T01:51:10+5:302015-02-15T01:53:13+5:30
पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीत आपल्यासाठी १९ जागांचा दावा केला असून भारतीय जनता पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

मगोला हव्यात १९ जागा
पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीत आपल्यासाठी १९ जागांचा दावा केला असून भारतीय जनता पक्षाकडे युतीचा प्रस्ताव सादर केला आहे.
मगोचे आमदार लवू मामलेदार यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन ही महिती दिली. त्यांनी सांगितले की, युतीसाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव लवकरच स्वीकृत करून प्रतिसाद द्यावा, असे मगोने लिहिलेल्या प्रस्तावाच्या पत्रात म्हटले आहे. भाजप मुख्यालयात हा प्रस्ताव सादर करण्यात आला.
जि.पं.च्या निवडणुका या पक्ष पातळीवर घेण्यात येणार असल्यामुळे या निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी भाजपला प्रस्ताव पाठविण्यात यावा, असा ठराव २४ जानेवारी रोजी झालेल्या मगो पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना पक्षाने शनिवारी प्रस्तावाचे पत्र भाजपाला सादर केल्याची माहिती मामलेदार यांनी दिली. ते म्हणाले की, राज्यात भाजप-मगो युतीचे सरकार आहे आणि युती करूनच विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात आल्या होत्या. लोकसभेच्या निवडणुकाही युती करूनच लढल्या गेल्या होत्या. त्यामुळे दोन्ही पक्षातील युती अजूनही आहे, असा त्याचा अर्थ होतो. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकाही युती करूनच लढविण्यात याव्यात, असे मगोला वाटते. सादर
करण्यात आलेला प्रस्ताव त्यामुळेच आहे, असे त्यांनी सांगितले.
मगोचे काम आणि प्रभाव असलेले एकूण १९ मतदारसंघ आहेत. त्यामुळे या १९ मतदारसंघांवर पक्षाचा दावा राहाणार आहे. सध्या मगोचे ११ जिल्हा पंचायत सदस्य असून त्यात ९ उत्तर गोव्यात आहेत, तर दक्षिणेत २ सदस्य आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
भाजपकडून लवकरच प्रतिसादाची अपेक्षा असून जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी पक्षाला उत्तर हवे आहे. भाजप युतीसाठी तयार नसेल, तर मग मगोला पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
(प्रतिनिधी)