१६,३०० विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By Admin | Updated: December 4, 2014 01:18 IST2014-12-04T01:18:39+5:302014-12-04T01:18:51+5:30
वासुदेव पागी ल्ल पणजी १ मार्च २०१५ रोजी सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी झाली असून एकूण १६,३०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

१६,३०० विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
वासुदेव पागी ल्ल पणजी
१ मार्च २०१५ रोजी सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी झाली असून एकूण १६,३०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मागील वर्षापेक्षा ३५०० अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
बारावी परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी यंदाच्या मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत बसणार आहेत, अशी माहिती गोवा शालान्त मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी दिली. मार्च २०१४ मध्ये १२,८०० विद्यार्थी होते.
बारावीच्या वर्गात झालेली विद्यार्थ्यांची वाढ ही सर्वंकष नियमित मूल्यांकनाच्या (सीसीई) अंमलबजावणीचा भाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे. राज्यात सीसीईची अंमलबजावणी २०११ साली इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंत सुरू करण्यात आली होती. सीसीईच्या अंमलबजावणीखाली पहिली तुकडी दहावीला २०१३ साली पोहोचली होती. त्या वर्षीही दहावीची परीक्षा सर्वाधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. त्याच वर्षाचे विद्यार्थी आता बारावीला पोहोचल्यामुळे संख्येतील फरक कायम राहिला आहे.
बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकदम ३५००च्या फरकाने वाढल्यामुळे या वर्षी उच्च शिक्षणासाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि दंतविषयक अभ्यासक्रमांसाठीही किमान टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दहावीच्या परीक्षेसाठी २०,५०० विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली आहे. ३१ मार्च रोजी दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा एकाच दिवशी सुरू करण्यात आल्या होत्या.