राज्यात एसटींच्या १६ पंचायती
By Admin | Updated: August 9, 2014 01:24 IST2014-08-09T01:21:11+5:302014-08-09T01:24:34+5:30
पणजी : गावडा, कुणबी, वेळीप आदी अनुसूचित जमातींचे लोक ४0 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या १६ ग्रामपंचायती गोव्यात आहेत. या समाजातील लोकांना योजनांचा

राज्यात एसटींच्या १६ पंचायती
पणजी : गावडा, कुणबी, वेळीप आदी अनुसूचित जमातींचे लोक ४0 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या १६ ग्रामपंचायती गोव्यात आहेत. या समाजातील लोकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी टक्केवारीनुसार आदिवासी कल्याण खात्याने या पंचायती अधिसूचित केल्या आहेत.
उत्तर गोव्यात तिसवाडीत करमळी, शिरदोण-पाळे तर फोंड्यात केरी पंचायतीत अनुसूचित जमातींच्या लोकांची संख्या ४0 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दक्षिण गोव्यात सासष्टीत राशोल, केपे तालुक्यात मोरपिर्ला, बार्से, आंबाली, बाळ्ळी-अडणे, कावरे, मळकर्णे, अवेडे-कोठंबी, सांगे तालुक्यात नेतुर्ली, काणकोण तालुक्यात खोतिगाव, गावडोंगरी, खोला व श्रीस्थळ या पंचायतींमध्ये अनुसूचित जमातींचे प्रमाण ४0 टक्क्यांहून अधिक आहे.
३0 ते ३९.९९ टक्के अनुसूचित जमातींचे लोक असलेल्या पंचायतींमध्ये उत्तर गोव्यात डिचोलीतील पिळगाव, सुर्ला, सत्तरीत भिरोंडा, फोंड्यात वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये, मडकई या पंचायतींचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात मुरगावमध्ये वेर्णा, कुठ्ठाळी, नुवे, लोटली, वेळ्ळी, पारोडा या पंचायतींचा तर केपेत नाकेरी (बेतुल) या पंचायतींचा समावेश आहे. सांगेत भाटी, कुर्टी, रिवण, धारबांदोड्यात किर्लपाल-दाभाळ व धारबांदोडा या पंचायतींचा समावेश आहे.
२0 ते २९.९९ टक्के अनुसूचित जमातींचा समावेश असलेल्या पंचायतींमध्ये उत्तर गोव्यात सत्तरीतील पिसुर्ले, फोंड्यातील भोम-अडकोण, कुंडई, बेतकी-खांडोळा, शिरोडा, पंचवाडी या पंचायतींचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात सासष्टीत राय, आंबेली, सां जुझे आरियल, केपेत फातर्पा, सांगेत उगे व काले या पंचायतींचा समावेश आहे.
२0 टक्क्यांपेक्षा जास्त अनुसूचित जमातींचे लोक असलेल्या पालिकांमध्ये केपे या एकमेव पालिकेचा समावेश आहे. आदिवासी कल्याण खात्याच्या संचालिका संध्या कामत यांनी ही अधिसूचना काढली आहे. आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी अलीकडेच विधानसभेत अनुसूचित जमातींचे भाग लवकरच अधिसूचित केले जातील, असे जाहीर केले होते. (प्रतिनिधी)