गडचिरोली :काँग्रेसने भाजपवर केलेल्या कथित मतचोरीच्या आरोपला माओवाद्यांनीही समर्थन दिले आहे. प्रतिबंधित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) पक्षाच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त ६ सप्टेंबरला केंद्रीय समितीने जारी केलेले १० पानी पत्रक १३ सप्टेंबरला समोर आले. यात वर्षभरात सुरक्षा यंत्रणांच्या मोहिमांमुळे चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची कबुलीही दिली आहे.
काँग्रेसने देशव्यापी मोहिमेद्वारे भाजपवर मत चोरीचे गंभीर आरोप करत कथित पुरावे राहुल गांधींच्या माध्यमातून सादर केले आहेत. या आरोपाला नक्षलवाद्यांनी दुजोरा देत, भाजपने मत चोरीचा प्रयोग प्रथम गुजरात विधानसभेत करून तोच देशभर राबवल्याचा दावा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६पर्यंत माओवादाचे समूळ उच्चाटन करण्याची घोषणा केल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आक्रमकपणे मोहिमा राबविल्या. यामुळे चळवळीची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे नक्षलवाद्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, सरकारने कारवाया थांबवून शांतीवार्तेचा मार्ग स्वीकारला तर आम्ही देखील सकारात्मक प्रतिसाद देऊ, असे आवाहन पत्रकातून केले आहे.
विकसित भारत म्हणजेच ‘हिंदूराष्ट्र’ हा सत्ता पक्षाचा गुप्त अजेंडा असल्याचा आरोप देखील नक्षलवाद्यांनी केला आहे. प्रतिबंधित सीपीआयच्या (माओवादी) २१ व्या स्थापना दिन२१ ते २७ सप्टेंबर दरम्यान सर्वत्र उत्साहात साजरा करावा, असे आवाहन देखील पत्रकातून करण्यात आले आहे.
वर्षभरात ३६६ नक्षल ठार
नक्षल चळवळीचा संस्थापक चारू मजुमदार याच्या मृत्यूनंतर पाच दशकांत सर्वाधिक नुकसान गेल्या वर्षभरात झाल्याची कबुली नक्षलवाद्यांनी दिली आहे. विविध चकमकीत ३६६ नक्षलवादी ठार झाल्याचे पत्रकात म्हटले आहे. महासचिव बसवाराजू, चलपती सह चार केंद्रीय समिती सदस्यांचा मृत्यू, १७ महत्त्वाचे नेते ठार झाल्याने चळवळीचे नुकसान झाल्याचे नमूद आहे.
गृहमंत्र्यांच्या घोषणेला दिले आव्हान
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपवू, अशी घोषणा केली आहे. मात्र, नक्षलवाद्यांनी हे लक्ष्य आम्ही खोडून काढू, अशा शब्दांत आव्हान दिले आहे.