लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी : जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यात रबी हंगामात उन्हाळी धानपीक घेतले जाते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. शिवाय रबी हंगामात तूर, मूग, उडीद, चणा, गहू व इतर पिकांची पेरणी करण्यात आली. मात्र अत्यल्प पावसामुळे जलसाठे आधीच कोरडे झाले. हवामानातही वारंवार बदल झाला. दरम्यान किडीचा प्रादुर्भावही पिकांवर झाला. या सर्व बाबीमुळे यंदा रबी पिकाच्या उताऱ्यात घट आल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शासनाच्या विविध योजनेतून शेततळे, सिंचन विहीर, तलाव खोलीकरण आदी सोयीसुविधा काही प्रमाणात झाल्या आहेत. या तोकड्या सिंचन सुविधेच्या भरवशावर बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदाच्या रबी हंगामात उन्हाळी धानपिकाची लागवड केली. तसेच आरमोरी, वैरागड, कुरखेडा, देसाईगंज या तालुक्यात कडधान्य पिकांवर भर देण्यात आला. शेतकऱ्यांनी धान व कडधान्य पिकांवर लागवडीसाठी मोठा खर्च केला. मात्र ऐन वेळी निसर्गाने साथ न दिल्याने याचा परिणाम रबी हंगामातील पिकांवर झाला.रबी हंगामातील पिकांवर मध्यंतरीच्या काळात विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. या रोगातून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी नाना तºहेच्या कीटकनाशकाची फवारणी केली. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवरील रोग काही दिवसांपुरती आटोक्यात आला. मात्र पुन्हा वातावरणात बदल झाल्याने अळीचा प्रादुर्भाव झाला.चणा, तूर, मूग, गहू, उडीद पीक भरण्याच्या स्थितीत असताना किडीचा प्रादुर्भाव झाला. शेतातील या पिकाची कापणी केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी मळणी केली. मळणीनंतर शेतकऱ्यांचा आशावाद फोल ठरला. शेतकऱ्यांनी काढलेल्या अंदाजाच्या तुलनेत अत्यंत कमी उत्पादन झाल्याने अनेक शेतकरी निराश झाले. एकूणच खरीप हंगामातही पीक चांगल्या पद्धतीने आले नाही. आता रबी हंगामातही निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.
रबी पिकाच्या उताऱ्यात यंदा प्रचंड घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:03 IST
जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यात रबी हंगामात उन्हाळी धानपीक घेतले जाते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. शिवाय रबी हंगामात तूर, मूग, उडीद, चणा, गहू व इतर पिकांची पेरणी करण्यात आली. मात्र अत्यल्प पावसामुळे जलसाठे आधीच कोरडे झाले.
रबी पिकाच्या उताऱ्यात यंदा प्रचंड घट
ठळक मुद्देधानासह तूर, गहू, मुगाचे उत्पादन कमी : रबी पिकाची कापणी व मळणी अंतिम टप्प्यात