३६ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ महापुराची पुनरावृत्ती हाेणार? सिराेंचा तालुक्यातील नागरिकांची ससेहाेलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 12:38 PM2022-07-28T12:38:24+5:302022-07-28T12:47:25+5:30

सिराेंचा शहर प्राणहिता नदीच्या काठावर वसले आहे. प्राणहिता नदीचे पाणी गाेदावरी नदीत येते. गाेदावरी नदीचे वाढलेले पाणी सिराेंचा शहरात शिरते. यात मेडिगड्डा प्रकल्पाची भर पडली आहे.

Will there be a repeat of deluge of 36 years ago? citizens of Sironcha taluka facing problems amid mattighatta dam project | ३६ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ महापुराची पुनरावृत्ती हाेणार? सिराेंचा तालुक्यातील नागरिकांची ससेहाेलपट

३६ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ महापुराची पुनरावृत्ती हाेणार? सिराेंचा तालुक्यातील नागरिकांची ससेहाेलपट

Next

कौसर खान

सिराेंचा (गडचिरोली) : सिराेंचा शहरासह तालुक्यात ३६ वर्षांपूर्वी म्हणजे सन १९८६ च्या ऑगस्ट महिन्यात प्राणहिता व गाेदावरी नदीला पूर आल्याने नागरिकांचे जनजीवन त्यावेळी विस्कळीत झाले हाेते. आता मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाचे पाणी सिराेंचा शहरासह तालुक्यात शिरत असल्याने यंदा जुलै महिन्यात दाेनदा पूरपरिस्थिती निर्माण झाली. मेडिगड्डा धरणामुळे ३६ वर्षांपूर्वीच्या त्या ‘महापुराची’ आता वारंवार पुनरावृत्ती हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या गाेदावरी नदीवर तेलंगणा सरकारने मेडिगड्डा प्रकल्प उभारला. मात्र यंदा निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे हा प्रकल्प तेलंगणातील नागरिकांसाठी तारक, तर महाराष्ट्राच्या हद्दीतील अर्थात सिराेंचा शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी मारक ठरत आहे. मेडिगड्डा प्रकल्प पूर्णत्वास आल्यापासून दरवर्षीच सिराेंचा तालुक्यातील शेतीला माेठा फटका बसत आहे. परिणामी या भागातील शेतकरी पूरपरिस्थितीने उद्ध्वस्त हाेण्याच्या मार्गावर आहे.

या वर्षी जुलै महिन्यात पावसाने कहरच केला. अहेरी उपविभागाच्या पाचही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. सिराेंचा तालुक्यात तब्बल आठवडाभर पुराने थैमान घातले हाेते. एकीकडे वरून पडणारा पाऊस, तर दुसरीकडे गाेदावरी व प्राणहिता नद्यांच्या पुराच्या पाण्याने वेढा घातल्यामुळे सिराेंचा शहर व तालुक्यात जलमय स्थिती निर्माण झाली. तालुक्याच्या सीमेकडील २० गावांतील नागरिकांवर संकट ओढवले. घरामध्ये कंबरभर पाणी शिरले. या पुराची पूर्वकल्पना आल्याने प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवून पूर ओसरेपर्यंत त्यांची सर्व व्यवस्था केली.

सिराेंचा शहर प्राणहिता नदीच्या काठावर वसले आहे. प्राणहिता नदीचे पाणी गाेदावरी नदीत येते. गाेदावरी नदीचे वाढलेले पाणी सिराेंचा शहरात शिरते. यात मेडिगड्डा प्रकल्पाची भर पडली आहे. प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे पाण्याचा लाेंढा सिराेंचा शहरासह तालुक्यात शिरला. घरातील साहित्य भिजून मोठे नुकसान झाले.

३० गावांमध्ये शिरले पुराचे पाणी

तेलंगणा सरकारने गाेदावरी नदीवर उभारलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाचे पाणी साेडल्याने सिराेंचा शहर व तालुक्यात पूरपरिस्थिती अधिकच बिकट झाली. प्राणहिता व गाेदावरी नदीच्या पुराचे पाणी सिराेंचा शहरासह तालुक्यातील ३० गावांमध्ये शिरले. नगरम, धर्मपुरी, आरडा, अंकिसा व असरअल्ली या भागांतील नागरिकांचे पुरामुळे माेठे नुकसान झाले. पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे या भागातील कापूस व मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले.

शहरातील रस्त्यांची पुरामुळे वाट लागली. सिराेंचा शहराच्या बाजारपेठेतही पाणी शिरल्याने व्यावसायिक व नागरिकांचे नुकसान झाले. एकूणच पूरपरिस्थितीने नागरिकांचे कंबरडे माेडले.

पूनर्वसन हाच पर्याय

मेडिगड्डा प्रकल्पामुळे सिरोंचा शहर व तालुक्याला दरवर्षी अशापद्धतीने पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील पूरबाधित नागरिकांना दुसरीकडे जागा उपलब्ध करून त्यांचे पूनर्वसन करणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी शासनाने निर्णय घेऊन सर्वसोयीसुविधा देऊन पूनर्वसन करण्याची गरज आहे.

Web Title: Will there be a repeat of deluge of 36 years ago? citizens of Sironcha taluka facing problems amid mattighatta dam project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.