देवराव होळी यांची माहिती : गडचिरोली, चामोर्शी, धानोरात आमसभागडचिरोली : ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘मेक इन गडचिरोली’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. यासाठी गडचिरोली विधासभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने गडचिरोली, चामोर्शी व धानोरा येथे पंचायत समित्यांमध्ये आमसभांचे आयोजन करण्यात आले आहे. या आमसभेला नागरिकांनी उपस्थित राहून आराखडा तयार करण्यासाठी सूचना कराव्यात, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेदरम्यान केले. नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी गडचिरोली येथे ५ फेब्रुवारी रोजी, चामार्शी येथे ६ व धानोरा ७ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती स्तरावरील आमसभांचे आयोजन करण्यात आले आहे. विकासात अडसर ठरणाऱ्या अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांचा निपटारा करणे कोणत्याही एका व्यक्तीला शक्य होत नाही. सर्व जनतेचा सहभाग मिळाल्यास समस्या नक्कीच दूर होतील. गावाचा व शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याबरोबरच गावात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून रोजगाराची निर्मीती करण्याच्या उद्देशाने गावातील नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. आपल्या गावाचा विकास आराखडा तयार करण्याच्या हेतुने प्रत्येक गावातील सरपंच, पोलीस पाटील, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, समाजसेवक, सुशिक्षित तरूण व विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करावे. पत्रकार परिषदेला सुधाकर येनगंधलवार, डेडूजी राऊत, अविनाश महाजन, रमेश भूरसे, अविनाश विश्रोजवार, अनिल पोहनकर, स्वप्नील वरघंटे आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
गाव विकासाचा आराखडा बनविणार
By admin | Updated: January 31, 2015 23:19 IST