रत्नाकर बोमीडवारलोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : तालुक्यात पक्के रस्ते, वीज, पाणी यासह विविध समस्या आहेत. यापैकीच चामोर्शी-हरणघाट-मूल हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे; परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष दिले नाही. केवळ २६ किमी लांबीचा रस्ता दोन हायवेला जोडतो. त्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. सदर मार्गाचे नूतनीकरण करावे. यासह मार्कंडेश्वर मंदिराचे रखडलेले जीर्णोद्धाराचे काम पुन्हा सुरू करावे, तसेच विविध समस्या सोडवाव्या, अशी मागणी नागरिकांच्यावतीने नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडे केली जात आहे.
चामोर्शी-हरणघाट-मूल हा मार्ग दोन हायवेला जोडतो. त्यामुळे सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून विकसित करण्यात यावा, यासाठी राष्ट्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले होते; परंतु पाठपुरावा कमी पडला. लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न सुटल्यावर येथील लोकांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अतिप्राचीन मार्कडेश्वर देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून त्या मंदिराला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून धूळखात पडला आहे.
कोरोना काळात बंद झालेली बसफेरी सुरू होईनागत अनेक वर्षापासून सुरू राहिलेली चंद्रपूर बससेवा लॉकडाऊनपासून बंद असून एकही बस सुरू नसावी, हे प्रवाशांचे दुर्दैव नव्हे काय? चंद्रपूरमार्गे थेट बससेवा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
शासकीय तंत्रनिकेतन, इंजिनिअरिंग कॉलेज हवे चामोर्शी हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. येथे शासकीय तंत्रनिकेतन, इंजिनिअरिंग कॉलेज निर्माण करणे गरजेचे आहे. ४० वर्षाच्या मागणीनंतर येथे क्रीडा संकुल मंजूर झाले; परंतु ती जागासुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात होती. आता ते मोकळी झालेली असली तरी काम संथगतीने सुरू आहे. केवळ आढावा बैठका घेऊन काम पूर्णत्वास जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.