कचरा व्यवस्थापन व खतनिर्मिती प्रकल्प भरभराटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:46 PM2018-05-21T22:46:30+5:302018-05-21T22:46:30+5:30

चामोर्शी तालुक्याच्या तळोधी येथील काही बचतगटाच्या ३३ महिलांनी एकत्र येऊन गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प डिसेंबर २०१५ मध्ये सुरू केला. सदर प्रकल्पाअंतर्गत गावातील ओला व सुका कचरा संकलित करून या कचऱ्यापासून हजारो रूपयांचे खत बनविले जात आहे.

Waste Management and Manufacturing Project Boom | कचरा व्यवस्थापन व खतनिर्मिती प्रकल्प भरभराटीस

कचरा व्यवस्थापन व खतनिर्मिती प्रकल्प भरभराटीस

googlenewsNext
ठळक मुद्देतळोधीतील १३ मजुरांना रोजगार : शेतकरी संघ व माविमच्या सहभागातून प्रकल्प यशस्वी, गावाची स्वच्छतेकडे वाटचाल

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी तालुक्याच्या तळोधी येथील काही बचतगटाच्या ३३ महिलांनी एकत्र येऊन गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प डिसेंबर २०१५ मध्ये सुरू केला. सदर प्रकल्पाअंतर्गत गावातील ओला व सुका कचरा संकलित करून या कचऱ्यापासून हजारो रूपयांचे खत बनविले जात आहे. सदर प्रकल्पातून एकूण १३ महिला व पुरूषांना नियमित रोजगार मिळत आहे. शिवाय या प्रकल्पातून तळोधीतील या उत्पादक गटाची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीनी महाराष्टÑ ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत चामोर्शी येथे श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्र आहे. या केंद्राअंतर्गत तळोधी (मो.) येथे तेजस्वीनी महिला शेतकरी संघ स्थापन करण्यात आला. त्यानंतर कचरा व्यवस्थापन व खत निर्मितीचा प्रकल्प चालविण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. सदर प्रकल्पाचे एकूण मूल्य ४ लाख ४५ हजार रूपये आहे. एवढी मोठी रक्कम कशी उभी करायची, असा प्रश्न महिलांसमोर सुरुवातीला निर्माण झाला. दरम्यान माविम व शेतकरी संघातील महिलांच्या सहभागाने काही रक्कम जुळविण्यात आली. या प्रकल्पासाठी शेतकरी संघाने बिनव्याजी कर्ज स्वरूपात ८० हजार रूपये दिले. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व सदर शेतकरी संघातील महिलांनी साहित्याची जुळवाजुळव करून ८० हजार रूपयांच्या वस्तूंची व्यवस्था केली. त्यानंतर माविमच्या चामोर्शी येथील लोक संचालित केंद्राच्या वतीने १ लाख ४० हजार रूपये पाच वर्षांनंतर परत करण्याच्या अटीवर या प्रकल्पासाठी देण्यात आले. अशा प्रकारे सदर प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण ३ लाख रूपयांची गुंतवणूक करण्यात आली.
सदर प्रकल्प स्थापन होऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला. सुरुवातीला वर्षभर या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. पोस्टर, बॅनर तसेच बैठका घेऊन या प्रकल्पाचे काय फायदे आहेत, हे नागरिकांना पटवून देण्यात आले. त्यानंतर लोकांचा या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येकी ५०० रूपये काढून शेतकरी संघातील ३३ महिलांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला दुसºया एका लोकसंचालित साधन केंद्राकडून सात ते आठ महिन्यासाठी घंटागाडी भाडेस्वरूपात घेतली. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव सादर करून घंटागाडी प्राप्त केली. सदर घंटागाडीसाठी बारमाही एक मजूर लावण्यात आला. सदर मजूर दररोज गावात फिरून लोकांकडील कचरा संकलित करीत आहे. सदर कचरा व्यवस्थापन व खतनिर्मिती प्रकल्पातून सदर शेतकरी संघाने आतापर्यंत दोन ते तीन टप्प्यात ५० ते ६० हजार रूपये किंमतीच्या खताची विक्री केली. तसेच यावर्षी अलिकडेच या शेतकरी संघाने २२ हजारांचे खत विकले आहे. सद्य:स्थितीत या संघाकडे ५० हजार रूपये किंमतीचा कम्पोस्ट व जैविक खत विक्रीसाठी उपलब्ध आहे. हातगाडी चालविणाऱ्या मजुराला प्रतिमहिना तीन हजार रूपये मानधन दिले जात आहे. १३ मजुरांना ४०३ दिवस या प्रकल्पातून रोजगार प्राप्त झाला आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ८६ हजार ४०० रूपये इतकी मजुरी मजुरांना मिळाली आहे.
सदर प्रकल्पाच्या माध्यमातून तळोधीवासीयांना स्वच्छतेची सवय लागली आहे. घरातील व गुरांच्या गोठ्यातील केरकचरा कुठे बाहेर न टाकता तो घंटागाडीत टाकला जात आहे. त्याचे व्यवस्थापन होत असल्याने गावात स्वच्छता आहे. सदर प्रकल्प ना नफा, ना तोटा या तत्वावर सध्या सुरू आहे.
‘लोकमत’च्या वृत्तातून झाली प्रकल्पाची उभारणी
तळोधीतील ३ लाख ४९ लाखांच्या गांढूळ खत निर्मिती व वास्तू शेडच्या दुरावस्थेबाबत सप्टेंबर २०१५ मध्ये लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या बातमीची दखल घेऊन माविम, बतगटाच्या महिला व लोकसंचालित साधन केंद्राने महिलांची बैठक बोलावून हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
असे तयार होते गावातच खत
कचरा व्यवस्थापन व खत निर्मितीच्या प्रकल्पासंदर्भात तेजस्वीनी महिला शेतकरी संघातील ३३ महिला जागरूक आहेत. घंटागाडीद्वारे गावातील कचरा संकलित केला जातो. त्यानंतर संघातील महिला या कचºयाचे विलगिकरण करतात. कचऱ्याची तपासणी करून काच, टीन, प्लास्टिक वस्तू, सुका व ओला कचरा वेगळा करतात. जमा झालेला सदर कचरा गावातील टाक्यांमध्ये टाकला जातो. सुरुवातीला ओला कचरा टाकून त्यावर शेणाचे पाणी सोडले जाते. त्यावर हलकिशी माती फिरविली जाते. त्यानंतर पुन्हा ओला कचरा टाकून झाकून ठेवल्या जाते. उन्हाळ्यात टाक्यातील कचरा सुकु नये यासाठी पाणी सोडले जाते. सदर कचरा कुजल्यानंतर तो चहापत्तीसारखा बनतो. त्यानंतर ५ ते ५० किलोच्या बॅगा तयार करून कम्पोस्ट व जैविक खत विकले जाते. सध्या ५ रूपये किलो दराने कम्पोस्ट तर १५ रूपये किलो दराने जैविक खत विकले जात आहे.

Web Title: Waste Management and Manufacturing Project Boom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.