गडचिराेली : मागील वर्षीचे कमिशन देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी जिल्हाभरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी १ मे पासून धान्य वितरण न करण्याचा इशारा दिला हाेता. त्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्र निर्गमित केले असून, धान्याचे वितरण न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ च्या कलम ३ (१)च्या तरतुदीनुसार सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ शिधापत्रिकाधारकांना मिळेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित ठेवल्यास अन्नसुरक्षा अधिनियमाच्या कलम २३ (१) अन्वये शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. १ मे पासून अन्नधान्य वितरणाची कामे न केल्यास राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्याचे समजण्यात येईल व संबंधित दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिला आहे.