लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी-हळदी माल गावादरम्यान मोठा नाला आहे. या नाल्यावर ३० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात अनेकदा पुलावरून पाच ते सहा फूट पाणी वाहत असते. परिणामी, वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सदर मार्गावरून एसटी महामंडळाच्या बसेस, दुचाकी, चारचाकी वाहने ये-जा करीत असतात. सदर पुलाची उंची १० ते १५ फूट आहे. सदर नाला वैनगंगा नदीला जोडला असून, पूल आणि नदी यामधील अंतर एक किमी आहे. वैनगंगा नदीला भरती आल्यानंतर या पुलापर्यंत दाब निर्माण होतो. परिणामी, या भागात पाऊस नसला तरी पुलावरील पाणी उतरत नाही. नाल्याच्या पलीकडील हळदी, गणपूर, मुधोली आदी गावातील मजूर याच मार्गाने पावसाळ्यात धान रोवणीसाठी लखमापूर बोरी येथे येतात. तसेच अन्य गावातील नागरिक लखमापूर बोरीला विविध कामानिमित्त येतात. हळदी, गणपूर, जैरामपूर, येनापूर येथील शालेय विद्यार्थी याच मार्गाने चामोर्शी व लखमापूर बोरी येथे शिक्षणासाठी येतात. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात हा मार्ग ठप्प होतो. त्यामुळे हळदी माल गावादरम्यानच्या नाल्यावर उंच पूल बांधण्याची मागणी आहे.