पोलिसांकडून स्वागत : अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणलेदेसाईगंज : तालुक्यातील विसोरा येथील महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेऊन गावात दारू विकली जाणार नाही, याचा संकल्प घेतला व अवैध दारूविक्रेत्यांविरूद्ध मोहीम उभारून गावात दारूबंदी केली. महिलांच्या पुढाकाराचे देसाईगंज पोलिसांनी स्वागत केले आहे. मात्र विसोरा परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांचे महिलांच्या या मोहीमेमुळे धाबे दणाणले आहे.विसोरा परिसरातील अनेक गावांमध्ये अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. त्यामुळे अनेक सुजाण नागरिकांंसह युवा पिढीही दारूच्या व्यसनी गेली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. अवैध दारूविक्रीमुळे अनेक दारूडे सकाळ व सायंकाळी दारूसाठी रिघ लावत होते. परिसरात छुप्या पद्धतीने दारूविक्री केली जात होती. याचा परिणाम कुटुंब व समाजावरही होत होता. विसोरा येथे सायंकाळी अनेक वार्डांमध्ये दारूड्यांचे थैमान राहत होते. याचा त्रास गावातील महिलांना होत होता. त्यामुळे गावातील महिलांनी पुढाकार घेऊन गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला व अवैध दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम राबविली. व गावातील दारूविक्री बंद केली. या मोहीमेत भामिला सहारे, राजकुमारी टेंभुर्णे, निर्मला जांभुळकर, विठाबाई टेंभुर्णे, किरण रामटेके, वंदना धाकडे, सविता सहारे, रेखा रामटेके, संजना टेंभुर्णे व दारूबंदी समितीच्या महिलांनी पुढाकार घेतला. महिलांच्या या कामगीरीचे ठाणेदार अण्णासाहेब मांजरे यांनी कौतूक केले आहे.
विसोरात महिलांनी केली दारूबंदी
By admin | Updated: August 27, 2014 23:28 IST