सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:36 AM2021-04-17T04:36:19+5:302021-04-17T04:36:19+5:30

सिरोंचा : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष ...

Villages in border areas neglected | सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षित

सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षित

googlenewsNext

सिरोंचा : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग न आल्याने बेरोजगारी वाढली आहे. या भागात वीज, पाणी, आरोग्य यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.

दुर्गम भागात माेबाईल सेवा कुचकामी

आलापल्ली : आलापल्ली येथे बीएसएनएलकडून थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे मिळत आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जीप्रमाणे दिली जात आहे.

अनेक प्रभागांमधील नाल्यांची दुरवस्था

गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाले खाली गेले आहेत. शिवाय, शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नाल्यात पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या नाल्यांवर कोणतेही आच्छादन नसल्याने किरकोळ अपघात होत आहेत.

स्मशानभूमींची दुरवस्था

कुरखेडा : जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेतली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणच्या दहनशेड मोडकळीस आल्या असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.

मामिडीताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी

झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे तातडीने पूल बांधणे आवश्यक आहे.

पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यांवर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच ये-जा करावी लागते. मात्र, या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार ?

गडचिरोली : सिंचाई विभागाने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधले आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

नागमाता मंदिराजवळ गतिरोधक निर्माण करा

आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, या मार्गाने भरधाव वेगाने वाहने जात असल्याने येथे गतिरोधक उभारावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित

एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध उभी राहत असल्यामुळे रहदारी प्रभावित होत असून, वाहनचालकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

नागाेबा देवस्थान दुर्लक्षित

गडचिरोली : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगावपासून दोन कि.मी. अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागोबा देवस्थानात दरवर्षी रथसप्तमीनिमित्त मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, येथे निवास, पाणी व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.

मुलचेरा शहरात पाळीव डुकरांचा हैदोस

मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

भामरागड तालुक्यात लाईनमनची पदे भरा

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते, परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते, तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे पदे भरण्याची मागणी होत आहे.

विश्रामगृहांची दुरवस्था कायम

सिराेंचा : तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून सिराेंचा येथे नवीन शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणीही करण्यात आली. मात्र, सदर विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. सिराेंचा तालुक्यात अनेक जुने विश्रामगृह आहेत. परंतु, सध्या त्यांची दुरवस्था झाली आहे.

पट्टे वाटपासाठी अट शिथिल करा

गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी होत आहे. शेकडो दावे तहसीलदारांच्या मार्फतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.

पर्यटनस्थळांचा विकास रखडला

कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध सौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी अनेक पर्यटनस्थळे आहेत, पण त्या ठिकाणी अजूनपर्यंत सोयीसुविधा नाहीत. या पर्यटनस्थळांचा विकास केल्यास पर्यटकांची गैरसोय होणार नाही. पर्यटनस्थळे असतानाही केवळ शासनाची मान्यता व निधी मिळत नसल्याने त्यांची वाताहत झाली आहे.

याेजनांबाबत जनजागृतीचा अभाव

कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.

गाळ उपशाअभावी नाल्या तुंबल्या

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर देण्याची मागणी होत आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी जमा झाले होते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला. सध्या नाल्या तुंबल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे गाळाचा उपसा करावा, अशी मागणी हाेत आहे.

मका लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग

गडचिरोली : रबी हंगामातील हमखास व अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून मक्याला ओळखले जाते. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात मका लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सध्या अनेक शेतकरी बियाणांची खरेदी करून मक्याची लागवड करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. यावर्षी मका पिकाचे क्षेत्र वाढले असून आता मका पीक जाेमात आहे. अनेक शेतकरी या पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत.

मुद्रांक विक्रीत नागरिकांची लूट

गडचिरोली : विविध कामांसाठी लागणाऱ्या मुद्रांकांची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने सुरू आहे. १०० रुपये किमतीचे मुद्रांक ११०, ५०० रुपयांचे मुद्रांक ५१० रुपयांना विकले जात आहेत.

डिजिटल बॅनरमुळे पेंटर झाले बेराेजगार

सिरोंचा : संगणकाद्वारे विविध मल्टीकलरचे आकर्षक बॅनर मशीनद्वारे बनविण्यात येतात. ते कमी किमतीत व कमी वेळात उपलब्ध होतात. त्यामुळे विविध रंगांचे डब्बे व ब्रश घेऊन दिसणारे पेंटर आता दिसेनासे झाले आहेत.

येवली येथे जलद बसला थांबा द्या

गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसला थांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्यांव्यतिरिक्त इतर आगारांच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी येथे जलद बसथांबा देण्याची मागणी होत आहे.

लोंबकळणाऱ्या तारांमुळे वाढला धोका

धानोरा : शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे तक्रारही केली आहे. मात्र, महावितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.

कलेक्टर कॉलनीत सांडपाण्याची दुर्गंधी

गडचिरोली : शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत समजल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्स परिसरातील कलेक्टर कॉलनीतील ड्रेनेजलाईन फुटली आहे. त्यामुळे सांडपाण्याची दुर्गंधी येत आहे. सातत्याने मागणी करूनही पालिका प्रशासनाचे समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

सट्टापट्टीसाठी इंटरनेटचा वापर वाढला

कुरखेडा : तालुक्यासह जिल्हाभरातील शहरी भागात सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे सट्टापट्टीचे नंबर शोधताना दिसून येतात. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

गोगाव-पिपरटोला मार्गाची दुरुस्ती करा

गडचिरोली : तालुक्यातील गोगाव - पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आलापल्ली येथे गतिरोधक उभारण्याची मागणी

आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, या मार्गाने भरधाव वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचेही आवागमन असते.

सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच

अहेरी : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांतून अवैध गुटखा विक्रीस आणला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आलापल्ली येथे बंधाऱ्याचे बांधकाम करा

आलापल्ली : परिसरातील गावांमध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. गावात अल्प हातपंप सुरू असल्याने येथे नव्याने हातपंपही निर्माण करावेत, अशी मागणी आहे. या भागात सिंचन सुविधा ताेकड्या असल्याने याचा परिणाम दाेन्ही हंगामातील विविध पिकांवर हाेत आहे.

खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

Web Title: Villages in border areas neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.