कन्हारटोला येथे ३ जून रोजी कृषी सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते. गडचिरोली जिल्हा भात लागवडीचा जिल्हा असून, येथे पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणात बियाणे, रासायनिक खते व औषधांचा वापर केला जातो. यामध्ये खूप माेठा खर्च होतो. हा खर्च कमी करण्यासाठी हिरवळीच्या खताचा वापर करावा. शेणखत, गांडूळ खत, बायोडायनामिक खत, वेस्ट डी कम्पोजर, गिरीपुष्प, धेंचा, सोनबोरू आणि अझोला यांचा वापर करून खतांवरील खर्च दहा टक्के कमी केला जाऊ शकतो, असे मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम यांनी केले. भात पिकावर येणाऱ्या किडी व रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. दशपर्णी अर्क तयार करून त्याचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद पाल यांनी केले. संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंर्भुने यांनी, तर आभार कृषी सहायक प्रफुल मेश्राम यांनी मानले. यावेळी कृषिमित्र किशोर उइके व गावातील शेतकरी उपस्थित होते.
खर्च कमी करण्यासाठी हिरवळीचे खत वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST