लाेकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील एका बियाणांच्या गाेदामावर छापा टाकून पोलीस व कृषी विभागाच्या भरारी पथकाने २३ लाख ६४ हजार रुपये किमतीचे अनधिकृत बीटी कापूस बियाणे जप्त केले. आठवडाभराआधी चामोर्शी तालुक्यातूनही बीटी बियाणे जप्त केले होते. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर बीटी बियाणांचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे.आलापल्ली येथील तुकाराम पेरगुवार यांच्या घरी असलेल्या गाेदामात हे प्रतिबंधित बियाणे ठेवले असल्याची गाेपनीय माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पाेलीस विभागाच्या मदतीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्या गाेदामात २ हजार २७० पाकिटे कापूस बियाणे व ३५० किलाे खुले बियाणे आढळून आले. शासकीय दराने त्यांची किंमत २३ लाख ६४ हजार ४७२ रुपये हाेते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बियाणांचे निरीक्षण केले असता, एकाही पाकिटावर परवाना, लॉट क्रमांक, दिनांक याचा उल्लेख आढळून आला नाही. त्यानुसार तुकाराम पेरगुवार, त्यांचा जावई दामाेदर झाडे व ज्याने बियाणांचा पुरवठा केला त्याच्याविराेधात भादंवि कलम ४२०, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदींनुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मूळ आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.ही कारवाई कृषी विभागाच्या तालुका भरारी पथकाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी संदेश खरात, कृषी अधिकारी प्रदीप राऊत, कृषी सहायक किरंगे, काेवासे, सहायक पाेलीस निरीक्षक शिंदे, पाेलीस उपनिरीक्षक शेडगे यांच्या पथकाने केली.
चोरट्या मार्गाने होते आयातजिल्ह्याच्या दक्षिण भागात कापसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे दक्षिणेकडील शासनाने प्रतिबंध घातलेल्या जनुकीय सुधारित बियाणांची (एचटीबीटी) अनधिकृतपणे विक्री वाढली आहे. यामुळे शेतजमिनीचा ऱ्हास होत असल्यामुळे हे बियाणे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही चोरट्या मार्गाने काही व्यापारी हे बियाणे विक्रीसाठी आणत आहेत.