गडचिरोली: भामरागड तालुक्यात माजी सभापतीची हत्या करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या माओवाद्यांना दुसऱ्याच दिवशी जबर हादरा बसला. दोन जहाल माओवादी जोडप्याने आत्मसमर्पण केले. या चौघांवर २८ लाख रुपयांचे बक्षीस होते. तीन दशकांपासून नक्षलचळवळीत राहून ८२ गुन्हे करणारा विभागीय समिती सदस्य अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर या चा यात समावेश आहे.
अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर(६३ , रा. अर्कापल्ली, ता. अहेरी) , त्याची पत्नी व क्षेत्रिय समिती सदस्य वनिता दोरे झोरे (५४, रा. कोरनार ता. एटापल्ली), प्लाटून ३२ सदस्य साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर(३० रा. तुमरकोडी ता. भामरागड) व पत्नी मुन्नी पोदीया कोरसा(२५, रा. सिलीगेंर ता. कोळा, जि. सुकमा ,छत्तीसगड)अशी त्यांची नावे आहेत.
बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर याच्यावर १६ लाख , वनिता झोरे हिच्यावर ६ लाख,साधू मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर याच्यावर ४ लाख तर मुन्नी कोरसा हिच्यावर २ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर होते.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर व त्याची पत्नी वनिता झोरे यांना १५ लाख रुपये तसेच साधू मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर व त्याची पत्नी मुन्नी कोरसा यांना ११ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे.
एका महिन्यातच १७ माओवाद्यांचे आत्मसमर्पणसन २०२२ पासून आतापर्यंत ५६० जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन चालू वर्षी महिनाभरातच १७ माओवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, नक्षलविरोधी अभियानचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ ९ बटालियनचे कमांडन्ट शंभु कुमार यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले.
कोणावर किती गुन्हे ?बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर याने १९९१ मध्ये अहेरी दलममधून सदस्य पदावर भरती होऊन माओवादी चळवळीत प्रवेश केला. ३१ चकमक, १७ जाळपोळ व ३४ इतर अशा एकूण ८२ गुन्ह्यांत त्याचा सहभाग आहे. त्याची पत्नी वनिता झोरे हिच्यावर १ गुन्हे दाखल आहेत. १९९३ मध्ये एटापल्ली दलममधून तिने गुन्हे चळवळीतील कारकीर्दीची सुरुवात केली. साधू मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर याच्यावर ४ गुन्हे दाखल असून २०१५ पासून तो माओवादी चळवळीसाठी काम करतो. त्याची पत्नी मुन्नी पोदीया कोरसा हिनेही २०१५ मध्येच माओवादी चळवळीत पाऊल ठेवले.