तुळशी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने गावपरिसरात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची विशेष तपासणी तुळशी येथील शिवाजी विद्यालयाच्या हरित संरक्षण गटामार्फत करण्यात आली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने तुळशी येथे पांदन रस्त्याच्या दुतर्फा, स्मशानभूमीत सन २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात वृक्षलागवड करण्यात आली होती. हरित संरक्षक गटाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांकडून ग्रामपंचायतीच्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्याचा निर्णय राज्यशासनाच्या रोजगार हमी योजने विभागाने घेतला. ही वृक्षलागवड तपासणी मोहीम जिल्हाभरात सुरू आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने विशेष बैठक बोलावून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. याच नियोजनाच्या अनुषंगाने शिवाजी विद्यालयाच्या हरित गटाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी तुळशी येथील वृक्ष लागवडीची तपासणी केली. सदर तपासणी शिवाजी विद्यालयाच्या हरित संरक्षक गटप्रमुख तथा सहाय्यक शिक्षक व्ही. एम. दुनेदार, हरित सेनेचे विद्यार्थी योगेश दुपारे, दिनेश दुनेदार यांनी शाळेला सुटी असलेल्या दिवशी केली. याप्रसंगी ग्रामरोजगार सेवक धर्मकीर्ती तुकाराम बन्सोड प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)
तुळशी येथे ग्रा. पं. च्या वृक्षलागवडीची तपासणी
By admin | Updated: September 10, 2014 23:41 IST