तालुक्यातील अनधिकृत वैद्यकीय प्रयोगशाळा व क्लिनिकल लॅबची तपासणी करून अनधिकृत प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार आरमोरी तालुक्यात २५ मे २०२१ रोजी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. तालुक्यातील सर्व सहा पॅथॉलॉजी केंद्रचालकांना महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे रजिस्ट्रेशन केल्याचे प्रमाणपत्र व बायोमेडिकल वेस्टचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत २२ जुलै आणि ३ ऑगस्ट २०२१ रोजी नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार आढळलेल्या तीन अनधिकृत लॅबमध्ये कोणीही तपासणीसाठी जाऊ नये. त्या सुरू असल्याचे आढळल्यास तहसील कार्यालयास कळवावे, जेणेकरून संबंधिताविरुद्ध नियमांनुसार कारवाई करता येईल, असे आवाहन तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले आहे.
(बॉक्स)
या पॅथॉलॉजी लॅब आहेत अनधिकृत
श्री पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, आरमोरीचे संचालक प्रीतम निमजे यांनी महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे नोंदणीसाठी प्रस्ताव सादर केल्याचे कागदपत्र व बायोमेडिकल वेस्ट प्रमाणपत्र सादर केले. अजून नोंदणी प्रमाणपत्र मिळाले नसल्यामुळे त्यांना पॅथॉलॉजी लॅबोरेटरी बंद ठेवण्याबाबत ४ ऑगस्ट रोजी नोटीस देण्यात आली होती. तसेच राधिका पॅथॉलॉजी लेबोरेटरी वडधाचे सुशांत शिवदास सरकार आणि लाईफलाईन पॅथॉलॉजी लॅबोरेटरी वडधाचे गोवर्धन गुरुदेव म्हशाखेत्री यांनी अनुक्रमे तीन व अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरी बंद केल्या असून, सद्य:स्थितीत अनुक्रमे किराणा दुकान व कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवत असल्याचे प्रतिज्ञापत्र स्टॅम्पपेपरवर सादर केले. त्यांनाही लॅबोरेटरी बंद ठेवण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.