अनेक गावांसाठी लाइनमनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:24 AM2021-06-20T04:24:30+5:302021-06-20T04:24:30+5:30

आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांत सुरळीत विद्युतपुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते. परंतु, अनेक गावांत ...

There is no lineman for many villages | अनेक गावांसाठी लाइनमनच नाही

अनेक गावांसाठी लाइनमनच नाही

Next

आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांत सुरळीत विद्युतपुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते. परंतु, अनेक गावांत लाइनमनच नसल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे लाइनमनची मागणी आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव

गडचिरोली : शहरातील अनेक कार्यालयांच्या इमारतींच्या परिसरात सर्वत्र अस्वच्छता आहे़ मागच्या बाजूने कच्चा रस्ता असून त्यावर घाण, कचरा साठून असतो़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे़ विशेषकरून शासकीय इमारतींच्या मागच्या बाजूस मोठ्या प्रमाणात घाण पसरली असल्याचे चित्र दिसून येते.

खतांच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले

चामोर्शी : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यांमुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यांत जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रा.पं. प्रशासनाने नाले स्वच्छतेच्या मोहिमेसोबत शेणखताच्या ढिगाऱ्यांची इतरत्र व्यवस्था करावी.

सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या

धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वनविभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी धानोरा तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

पीएचसीसाठी इमारत बांधण्याची मागणी

भामरागड : तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतींअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. सदर आरोग्य केंद्रांच्या नव्या इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी लाहेरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

वसा येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागेपल्लीचे दूध शीतकरण केंद्र सुरू करा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाची दूध शीतकरण केंद्रे आहेत. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने सदर शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित

धानोरा : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायतस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत. शासनाने योग्य अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

विद्युततारांना खेटून इमारतींचे बांधकाम

गडचिरोली : शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणांचे प्रमाण वाढत चालले आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युततारांच्या अगदी जवळून इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याकडे नगर परिषदेचे मात्र दुर्लक्ष होत आहे. परिणामी, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

तोडसा येथे भ्रमणध्वनी टॉवर उभारा

एटापल्ली : तालुक्यातील तोडसा येथे बीएसएनएल टॉवर उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एटापल्ली तालुक्यात बीएसएनएलचा कव्हरेज राहत नसल्याने नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन अनेक कामे करावी लागतात. तोडसा परिसरात बीएसएनएलचा कव्हरेज राहत नसल्याने मोठी अडचण होते.

आरमोरी तालुक्यातील रस्त्यांची रुंदी वाढवा

आरमोरी : तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागांतील रस्त्यांची रुंदी अत्यंत कमी आहे. या रस्त्यांवरून एकच वाहन जाऊ शकते. दुसरे वाहन जातेवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढविण्याची मागणी होत आहे.

बँकांअभावी ग्रामीण नागरिकांची अडचण

धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय बँकांच्या शाखा नाहीत. धानोरा तालुक्यातील नागरिकांना व्यवहार करण्याकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. तालुक्यात मुंगनेर, पेंढरी येथे बँकेची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने मुंगनेर, पेंढरी भागातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहानमोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्षच आहे.

कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी

अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी, जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

वीजचाेरीचे प्रमाण वाढतीवरच

गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागांत कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारांवर आकडा टाकून वीजचोरी केली जात आहे.

नाल्यांचा उपसा नाही, डास वाढले

एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डांतील नाले कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरले आहेत. ओपन स्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

पाळीव डुकरांचा हैदोस वाढला

मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने स्वच्छतेबाबत माेहीम हाती घेतली नाही.

तोट्या नसल्याने पाण्याचा अपव्यय

गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरांतील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. याकडे नगर परिषदेने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी.

Web Title: There is no lineman for many villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.