लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा (गडचिरोली) : तालुक्यातील देऊळगाव येथील ४ कोटी रुपयांच्या बहुचर्चित धान खरेदी घोटाळ्यातील सूत्रधार व आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचा व्यवस्थापक महेंद्र इस्तारी मेश्राम याला २५ ऑगस्ट रोजी रात्री पोलिसांनी चार महिन्यांनंतर अटक केली.
कुरखेडा ठाण्यात मे महिन्यात आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणेंसह दोन कर्मचारी, संस्थाध्यक्ष व संचालकांसह एकूण १७ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. बावणे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व फरार व्यवस्थापकाला अटक जामीन मंजूर केला होता, तर संस्थेच्या अध्यक्षा आणि काही महिला संचालकांना अटक झाली होती. सध्या अध्यक्षा आणि सर्व संचालक जामिनावर बाहेर आहेत. व्यवस्थापक महेंद्र मेश्राम चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
धान खरेदी केंद्रावर बनावट बिले तयार करणे, शेतकऱ्यांच्या नावाने जास्त खरेदी दाखवणे आणि निधीचा गैरवापर केल्याचा मेश्राम याच्यावर आरोप आहे. त्याच्या अटकेने या प्रकरणात नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.
सहा दिवसांची पोलिस कोठडीकुरखेडा पोलिसांनी महेंद्र मेश्राम याला कुरखेडा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर २६ ऑगस्ट रोजी हजर केले. त्याला ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.