लोकमत न्यूज नेटवर्क भेंडाळा: चामोर्शी तालुक्यातील हरणघाट ते चामोर्शी रस्ता चंद्रपूर, नागपूर तसेच इतरत्र कुठेही जाण्यासाठी वाहनधारकांना जवळचा आहे. मात्र हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून खड्डेमय झाला आहे. त्यासाठी या रस्त्याची नव्याने बांधणी करावी म्हणून शासनाकडे सतत मागणी केली जात होती. त्याची दखल घेत शासनाने रस्ता बांधकामाची मान्यता दिली आहे. आणि या एकूण १५ किमीच्या रस्त्यापैकी सात ते आठ किमीच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले. पण अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याचे अवघ्या तीन महिन्यांतच तीनतेरा वाजले. परिणामी वाहनचालकांना चामोर्शी-मूल मार्गावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
अल्पावधीत सदर कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले की काय, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. दररोज शेकडो अति जडवाहने या रस्त्याने जात असल्याने हा संपूर्ण रस्ता फुटून गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या रस्त्यांची डागडुजी करण्यात आली, पण या मार्गावरील जडवाहतूक बंद केली तरच हा रस्ता टिकेल अन्यथा नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळात या मार्गावर काही काळ जडवाहतूक बंद होती, पण आता पूर्ववत सुरू झाली आहे.
दररोज शेकडो ट्रक या रस्त्यावरून जात असतात, त्यामुळे या मार्गावरची जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळती करावी, अशी मागणी भेंडाळा परिसरातील वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.
कमरेसह मणक्याचे आजार वाढलेनागपूर, चंद्रपूर, अहेरी, सिरोंचा आदी ठिकाणी जाण्यासाठी तसेच मार्कंडा येथे भाविक धार्मिक विधीसाठी येत असतात. त्यामुळे हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. पण या रस्त्यावर पदोपदी खड्डे असल्याने हे रस्ते प्रवाशांना गचके देत असतात. या रस्त्यावरून जात असताना धुळीचा सामना करावा लागत आहे. तसेच खट्टेमय रस्त्यातून प्रवास केल्यामुळे अनेकांना कमरेचे आजार, मणक्याचे आजार सुद्धा जडलेले आहेत.
कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्हचामोर्शी-भेंडाळा-मूल रस्ता खराब झाल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचे कंत्राट प्रशासनाच्या वतीने कंत्राटदाराला देण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने सदर रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र हे डांबरीकरण अल्पावधीत उखडले असून रस्त्यावर खड्डे पडले असून परिणामी सदर रस्ता डांबरीकरण कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यवेक्षिय यंत्रणा नेमकी काय करीत आहे, असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली सदर मार्गावरून जडवाहतुकीस मज्जाव / बंदी असेल. सदर वाहतूक पर्यायी मार्ग आष्टी, चामोर्शी, गडचिरोली मूल मार्गे करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात काढले होते. चामोर्शी येथील आष्टी टी पॉईंटवर मूल रस्त्यावर अशा सूचना देणारे फलक लावलेले आहेत. त्यावेळेस रस्त्याचे काम सुरू होते, म्हणून असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. पण हा आदेश पुढील आदेशापर्यंत असल्याने अजूनही या रस्त्यावर जड वाहनांना बंदी आहे, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून अति जडवाहनांची सदर मार्गावरून वाहतूक सर्रास सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची या ठिकाणी पायमल्ली होताना दिसत आहे.