गडचिरोली : मागील पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून यामुळे घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. उन्हामध्ये काम करणार्या उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. २५ मे पासून नवतपांना सुरूवात होते. या कालावधीत संपूर्ण राज्याच्या तापमानात कमालीची वाढ होत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळेच या कालावधीला राज्यात नवतपामुळे ओळखले जाते. ताममानामध्ये झालेली वाढ मान्सुनच्या आगमनापर्यंत कायम राहते. दरवर्षीच्या अनुभवाची यावर्षीही पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून येत आहे. मागील पाच दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी ११ नंतर घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. दिवसभर वाहन व नागरिकांनी फुलून दिसणारे रस्ते आता दुपारच्या सुमारास निर्मनुष्य व्हायला लागले आहेत. या कालावधीत ग्रामीण भागात हंगामपूर्व शेतीची कामे केली जात आहेत. मात्र वाढलेल्या तापमानामुळे दिवसभर काम करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे मजुरही सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंतच काम करण्यास तयार होत आहेत. मजूर मिळत नसल्याने एवढय़ा कामासाठीही दिवसभराची मजूरी मोजावी लागत आहे. वाढलेल्या तापमानाचा पारा मान्सुनचे आगमन होईपर्यंत कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. (नगर प्रतिनिधी)
जिल्ह्याचे तापमान ४५ अंशाच्या वर
By admin | Updated: June 2, 2014 01:13 IST